सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी दुपारी सातारा-कोरेगाव राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक अर्धा तास थांबली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच केंद्र शासनाने शेतकरीविरोधात घेतलेल्या भूमिकेचा यावेळी निषेध करण्यात आला.
येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बुधवारी एकत्रित आले. रास्ता रोकोचा इशारा आधीच दिला असल्याने या ठिकाणी पोलिसांनीही पहारा ठेवला होता. स्वाभिमानीचे कार्यकर्ते याठिकाणी एकत्रित आले. पोलीस संरक्षणातच कार्यकर्त्यांनी येथे रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलक कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबली. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. शेतक-यांना लूटवापसी म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी शेतीमालाला दीडपट भावाची हमी मिळेल अशी धोरणे स्वीकारावी, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतक-यांना ख-या अर्थाने संरक्षण मिळेल, अशी पीक विमा योजना सुरू करावी, कसत असलेल्या जमिनीचे हक्क कसणाºयांच्या नावे करावी व शेतीच्या सर्वंकष, शाश्वत व गतिमान विकासासाठी डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार पर्यायी शेती धोरणाची आखणी करावी, या मागण्या करण्यात आल्या.
- ग्रामीण भागात बंदची हाक
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी निवडणुकीत सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याप्रमाणेच संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व विविध शेतकरी संघटना यांच्यासोबत आपल्या जिल्'ातील ग्रामीण भागात बंद पाळण्यात आला.