सातारा : रस्त्यावरच काय अंगणातही घाण दिसली तरी प्रत्येक जण नाक मुरडतो. तो कचरा उचलावा, स्वच्छता राखावी असा विचारही अनेकांच्या मनात येत नाही. मात्र, मानेवाडी (ता. सातारा) येथे राहणाऱ्या सत्तर वर्षांच्या आजीबाई याला अपवाद आहेत. त्यांनी स्वत:ला सज्जनगडाच्या सेवेत वाहून घेतले असून, गेल्या नऊ वर्षांपासून त्या मुखात श्रीरामाचा जप अन् हातात झाडू घेऊन गडाच्या पायरीमार्गाची नि:स्वार्थ भावनेने स्वच्छता करीत आहेत.शारदाबाई सर्जेराव मोरे असे या वृद्धेचे नाव आहे. अकरा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे अपघातात निधन झाले. घरी मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार असला तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच त्यांच्या कुटुंबाचा दिनक्रम. आपले उरलेले आयुष्य सत्कारणी लागावे म्हणून शारदाबाई मोरे यांनी नऊ वर्षांपूर्वी स्वत:ला समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडाच्या (परळीचा किल्ला) सेवेत वाहून घेतले.सकाळी लवकर उठणे, एसटी अथवा मिळेल त्या वाहनाने सज्जनगड गाठणे, पायरी मार्ग स्वच्छ करणे, कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे, हे काम ते अवितरपणे करीत आहेत. ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता शारदाबाई मोरे मुखात श्री रामाचा जप आणि हातात झाडू घेऊन येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्वच्छतेचा संदेश देतात.
लाेकांनी आदर्श घ्यावा..आजची तरुण पिढी मोबाइल विश्वात गुरफटून गेली आहे. अशा तरुणांसाठी या सत्तर वर्षांच्या आजीबाई आणि त्यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. आपण गड-किल्ले तर स्वच्छ करू शकत नाही; परंतु घर व परिसराची तरी स्वच्छता राखू शकतो. त्यामुळे तरुणच नव्हे तर नागरिकांनीदेखील शारदाबाई मोरे यांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली.
मी गेल्या नऊ वर्षांपासून नि:स्वार्थ भावनेने स्वच्छतेचे काम करत आहे. आता काया थकली आहे. गुडघे दुखतात. स्वच्छतेचे काम संथगतीने सुरू असले तरी मी त्यात खंड पडू दिलेला नाही. मी कोणाकडेही काही मागत नाही. काही पर्यटक स्वखुशीने मला पाच-दहा रुपये देऊ करतात. या पैशांवरच मी स्वत:सह कुटुंबाची गुजराण करते. - शारदाबाई मोरे, मानेवाडी