सातारा : सातारा तालुक्यातील वेणेगाव येथील वेणेगाव विकाससेवा सोसायटीच्या निवडणुकीत अजिंक्य परिवर्तन पॅनेलने पद्मावती माता पॅनेलचा धुव्वा उडवून सत्तेच्या चाव्या मिळविल्या. ७० वर्षांच्या कालावधीत प्रथमच या सोसायटीत सत्तांतर झाले असून, अजिंक्य परिवर्तन पॅनेलने १२- १ अशा फरकाने पद्मावती माता पॅनेलचा पराभव करून एक इतिहास निर्माण केला. विजयी सदस्यांचे आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी कौतुक केले असून, ‘सत्तेच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या हितासाठी काम करा,’ असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.वेणेगाव सोसायटीची ७० वर्षांच्या कालावधीत प्रथमच निवडणूक लागल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पद्मावती माता पॅनेलची एक जागा बिनविरोध झाल्याने १२ जागांसाठी मतदानप्रक्रिया घेण्यात आली. सुनील काटे- देशमुख, अकबर मुलाणी यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य परिवर्तन पॅनेलने १२ पैकी १२ जागा मिळवून सोसायटीचे माजी अध्यक्ष विकास घोरपडे यांच्या पद्मावती पॅनेलचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत अजिंक्य पॅनेलचे उमेश काटे, प्रशांत घोरपडे, दिलीपकुमार चव्हाण, चंद्रकांत जाधव, शंकर देशमुख, अकबर मुलाणी, धोंडिराम सावंत, दादा सावंत, उषादेवी घोरपडे, शशीकला सावंत, राजेश कुचेकर आणि भीमराव चव्हाण हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांसह पॅनेलचे प्रमुख सुनील काटे व कार्यकर्त्यांनी सुरुची येथे जाऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. शिवेंद्रसिंहराजेंनी विजयी उमेदवारांचा सत्कार करून कौतुक केले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘हिताचे काम करून सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा. आगामी काळात सभासद, शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जपुरवठा करणे, विविध योजनांचा लाभ देणे, यासाठी सत्ताधाऱ्यांनी कार्यरत राहावे,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)
सत्तर वर्षांनंतर वेणेगाव सोसायटीत ऐतिहासिक सत्तांतर
By admin | Published: February 22, 2015 10:23 PM