खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्या परिसरातील एस वळणावर अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी कंटेनर उलटी होऊन दोनजण जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही हे वळण कायमचे काढून टाकण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या वळणावर अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून महामागार्ने बोअर खोदकाम करणारा कंटेनर ( एमएच ११ एएल ४४६६) हा बोगदा ओलांडून पुढे आला. तीव्र उतारावरील एस वळणावर ट्रकचा गियर बॉक्स तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर एस वळणावरील पूलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला. या ट्रकमधून १४ कामगार प्रवास करीत होते. अपघातात दोन कामगार जागीच ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटली नाही.
कालीमत्तू ( वय ३२ ) , प्रमोद ( वय ३६ ) , विठ्ठल भोगम ( वय २५ ) , मुस्तफा , शैलदुराई , राजा स्वामी , निलू , केसू सिंग ( वय ३० ) , मुन्ना स्वामी , व्यंकटेशन लक्ष्मण , बाबूलाल , जंगमू सलाम ( वय २५ ) हे १२ कामगार जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस व महामार्ग पोलिसांनी घाटात धाव घेऊन जखमी कामगारांना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
ट्रकचा चक्काचूर अन् जखमींच्या किंकाळ्या ..
घाटातील एस वळणावर ट्रक संरक्षक कठड्याला अतिशय वेगाने धडकला. त्याची तीव्रता एवढी होती की ट्रकचा चक्काचूर झाला. ट्रकचे सर्व भाग तुटून महामार्गावर विखुरले तर काही भाग कठड्यावरुन खाली फेकले गेले. उगवत्या सूर्यालाच अपघात घडल्याने घाटात जखमींच्या किंकाळयांनी परिसर भयभीत झाला होता. साहित्याच्या गराड्यातून पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. अपघाताची मालिका सुरूच ...खंबाटकीतील एस वळणावर बऱ्याचदा चालकांच्या हे एस वळण लक्षात येत नाही. पुढे अचानक एस आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. मागील महिन्यात या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला एक पाय गमवावा लागला.
या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.