उंब्रज : कऱ्हाड तालुक्यातील एका आश्रम शाळेत तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून शाळेच्या मुख्याध्यापकासह एक शिक्षक आणि शिपायावर उंब्रज पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे स्वत: उंब्रज पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते. मुख्याध्यापक इंगळे सर, शिक्षक गोपणे सर, शिपाई इगळे दादा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले. आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येताच खळबळ उडाली. पोलिस उपविभागीय अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, प्रांताधिकारी किशोर पवार, तळबीड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)च्जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार हेही रात्री उशिरा तत्काळ उंब्रज पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले. या प्रकाराची माहिती घेऊन पुढील तपास कसा करावा, याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. उंब्रज पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत संबंधित पीडित मुलीची फिर्याद नोंदवून घेण्याचे काम सुरू होते. माझ्यासह अन्य दोन मुलींचाही या तिघांनी लैगिंक छळ केल्याचे संबंधित पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे उंब्रज पोलिसांनी सांगितले.
आश्रम शाळेतील तीन मुलींचा लैंगिक छळ
By admin | Published: January 20, 2017 10:30 PM