सातारा : वीज वितरण कंपनीकडून विद्युत वाहिनी स्थलांतरित करण्याचे काम मंगळवारी (दि. १९) हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहापूर योजनेचा पाणीपुरवठा मंगळवार व बुधवारी बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. शहापूर योजनेची ११ केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनी स्थलांतरित केली जाणार आहे. वीज वितरणकडून हे काम मंगळवारी हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी सुमारे आठ तासांचा कालावधी लागणार असल्याने शहापूर योजनेचा पाणीपुरवठा मंगळवार व बुधवारी बंद राहणार आहे.
मंगळवारी चार भिंती टाकी ते कूपर कारखाना, कुंभार वाडा परिसर, लोणार गल्ली, पोवई नाका भाजी मंडई, रविवार पेठ, मल्हार पेठ, पंताचा गोठ, शेटे चौक या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर बुधवारी गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकीद्वारे वितरण होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.