वाई : ‘अमर रहे अमर रहे गणेश ढवळे अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत शहीद जवान गणेश ढवळे यांच्या पार्थिवावर बुधवारी वाई तालुक्यातील आसरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी कृष्णाकाठी जनसमुदाय लोटला होता़. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून कृष्णाकाठही गहिवरला.शहीद जवान गणेश ढवळे यांचे पार्थिव वाई तालुक्यातील आसरे येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी आणण्यात आले. या ठिकाणी कुटुंबीयांसह हजारो ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावण्यात आले होते. ‘अमर रहे अमर रहे गणेश ढवळे अमर रहे, भारत माता की जय,’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा वैभवनगर येथील स्मशानभूमीत पोहोचली.या ठिकाणी पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सैनिक कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, वीरपिता किसन ढवळे, वीरपत्नी रेश्मा, वीरमाता राधाबाई व वीर भगिनी जयश्री, भाग्यश्री आणि निर्मला यांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले. यानंतर १२ मराठा लाईफ इन्फंट्री बटालियनच्या वतीने चिमण्णा मिरजी, २२ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, टीए बटालियन कोल्हापूर, १०९ टीए बटालियनच्या वतीने सुभेदार देसाई, ५६ आरआर बटालियनच्या वतीने श्रीनिवास पाटील, चीफ आॅॅफ आर्मी स्टाफ स्टेशन कोल्हापूर कमांडर कावेरी अप्पा यांनी पुष्पचक्र वाहून शहीद जवान गणेश ढवळे यांना मानवंदना दिली.लष्कराच्या १४ जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगूल वाजवून मानवंदना देण्यात आली. यानंतर शहीद गणेश ढवळे यांचे वडील किसन ढवळे यांनी पार्थिवाला अग्नी देऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. (प्रतिनिधी)कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले...जवान गणेश ढवळे यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून त्यांचे कुटुंब शोकसागरात बुडून गेले होते़ आई, वडील, पत्नी व बहिणी यांच्यासह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष त्यांच्या पार्थिवाकडे लागून राहिले होते. बुधवारी सकाळी जवान गणेश ढवळे यांचे पार्थिव आसरे या गावी आणण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून अनेकांच्या अश्रूंची वाट मोकळी झाली.नागरिकांनी वाहिली श्रद्धांजलीजवान गणेश ढवळे यांच्या अंत्ययात्रेसाठी वाईच्या पश्चिम भागासह तालुक्यातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती़ आरसे गावात पार्थिवाचे आगमन होताच हजारो नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली़ अंत्ययात्रेत परिसरातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
शहीद जवान गणेश ढवळे अनंतात विलीन
By admin | Published: February 01, 2017 11:15 PM