सातारा : कोरोनामुळे उद्योग, व्यवसायांना आर्थिक फटका बसला असून, याची झळ रंगकर्मींनाही बसली आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत पालिका प्रशासनाने शाहू कलामंदिराच्या शुल्कात पन्नास टक्के कपात करावी, अशी मागणी अभिनेता प्रशांत दामले यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे केली.
सातारकरांना दर्जेदार नाट्यप्रयोगांची अनुभूती देणाऱ्या शाहू कला मंदिराचे पालिकेकडून नूतनीकरण केले जात आहे. येत्या काही दिवसांत हे कलादालन रंगकर्मींसाठी खुले होणार आहे. नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेवक किशोर शिंदे, अभिनेता प्रशांत दामले, माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शाहू कला मंदिराला भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला.
कोरोनामुळे सर्वच चित्र बदलून गेले आहे. संक्रमण कमी झाले असले तरी परिस्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. शासनाने नाट्यगृहातील उपस्थितीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने संपूर्ण शुल्क न आकारता त्यात पन्नास टक्के सवलत द्यावी, अशी मागणी प्रशांत दामले यांनी केली. सर्व नगरसेवक व प्रशासनाशी याबाबत चर्चा करून आगामी सर्वसाधारण सभेत याबाबतच ठराव मंजुरीसाठी ठेवला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा माधवी कदम व नगरसेवक किशोर शिंदे यांनी दिली.
फोटो : ११ प्रशांत दामले
नगराध्यक्षा माधवी कदम, अभिनेता प्रशांत दामले, नगरसेवक किशोर शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी शाहू कला मंदिरातील कामकाजाची पाहणी केली.