लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेने बिल न भरल्याने शाहूपुरीतील पथदीपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. फक्त शाहूपुरीचेच नव्हे तर महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या पथदीपांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्याचे कुसळ शोधणारे निवडणुका जवळ आल्यामुळे राजकारण म्हणून तत्कालीन शाहुपूरी ग्रामपंचायतीवर चिखलफेक करण्याची संधी साधत आहेत, अशी टीका शाहूपुरीचे तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोणाचेही नाव न घेता केली आहे.
या पत्रकात नमूद केले आहे की, शाहुपूरीचा भाग आता नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. त्या दिवसापासून नगर परिषद पथदीपांचे बिल भरण्यास बांधिल आहे. याकरिता संबंधित विद्युत अभियंता आणि मुख्याधिकारी यांना पथदीप वेळेवर आणि नियमितपणे सुरु ठेवण्याविषयी खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे येथील पथदीप पूर्ववत होतील. परंतु, स्वत: प्रचंड ज्ञानी आणि आक्रमक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारे सुतावरुन स्वर्ग गाठत लगेच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सरसावले आहेत. शाहुपूरीत भ्रष्टाचार झाला मग इतर ग्रामपंचायतींच्याही पथदीपांची कनेक्शन तोडली आहेत, त्यातही भ्रष्टाचारच झाला असेच त्यांना म्हणायचे असेल तर ते सर्वथा चुकीचे आहे.
पथदीपांचे बिल कुणी भरायचे हा वाद असू शकतो, त्यावर तोडगा निघू शकतो; परंतु हे ज्ञानी साप समजून भुई थोपटत आहेत. सध्या पथदीपांचा प्रश्न जिल्हा परिषदेने बिल न भरल्याने निर्माण झाला आहे. तो फक्त शाहुपूरी पुरताच मर्यादित नाही. संपूर्ण राज्यामधील ग्रामपंचायतींच्या पथदीपांचा प्रश्न आहे. सुदैवाने पालिकेच्या हद्दीत भाग समाविष्ट झाला असल्याने आता ही जबाबदारी पालिकेवर येणार आहे. ती जबाबदारी पालिका बिनचूकपणे पार पाडेल; परंतु पूर्वीची जबाबदारी जिल्हा परिषदेची, शासनाची राहील व शासन याबाबत योग्य तो निर्णय घेईलच. खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना केल्याने लवकरच शाहुपूरीचीच नव्हे तर महाराष्ट्रातील कनेक्शन तोडलेल्या ग्रामपंचायतींचे पथदीप पूर्ववत होतील, अशा शब्दात तत्कालीन सरपंच आणि उपसरपंच यांनी शाहुपूरीकरांना आश्वस्त केले आहे.