सागर गुजर
सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने प्रस्थापित नेत्यांना मोठे हादरे दिले तर नवोदित नेतृत्वांच्या हाती सत्ता दिली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्ष सोडल्याची जबर किंमत राष्ट्रवादीला सातारा - जावळी, कऱ्हाड उत्तर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघांत मोजावी लागल्याचे चित्र आहे.
सातारा जिल्हा हा १९९९ पासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने कायमच वर्चस्व राखले. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये वजन असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला पहिला धक्का दिला. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्याने कोरेगाव उत्तर मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषद गटांमध्येदेखील राष्ट्रवादीला खिंडार पडले. सध्या सैन्य राष्ट्रवादीत अन राजा भाजपमध्ये असे चित्र आहे. याच सैन्याच्या जोरावर शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा, जावळी आणि कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघांतील ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा आपले वर्चस्व राखले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळे १०० च्यावर ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये बहुतांश ग्रामपंचायती या राजे गटाच्या ताब्यात राहिल्या आहेत. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोडोली ग्रामपंचायतीत खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी सत्ता कायम ठेवली आहे. अंगापूर वंदन ग्रामपंचायतीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सत्तांतर घडवले.
वाई तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला मतदारांनी पसंती दिली असून, महाविकास आघाडीचा प्रयोगही काही ग्रामपंचायतींमध्ये यशस्वी ठरला आहे. उडतारे, बावधन, लोहारे, देगाव, कडेगाव, खानापूर सुरूर, केंजळ या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिलेला आहे.
कोरेगाव महाविकास आघाडीला यश मिळाले असले तरीदेखील आमदार शशिकांत शिंदे यांच्या ताब्यातून लासुर्णे ग्रामपंचायतीची सत्ता निसटलेली आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघातील भोसे, विसापूर महागाव, शिवथर ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने सत्ता मिळवली.
फलटण मतदारसंघांमध्ये राजे गटाने सत्ता राखली आहे. साखरवाडीत मात्र राजेंना शिरकाव करता आला नाही. माणमध्ये आमदार जयकुमार गोरे यांना मानणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक गटाने जोरदार लढत दिली आहे. माण - खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जयकुमार गोरेंमुळे भाजपला सुगीचे दिवस आले. कारखेल ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली. पाटण मतदारसंघात मंत्री शंभुराज देसाई यांनी बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे.
कऱ्हाड उत्तरमध्ये कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीची सत्ता मिळवत मंत्री बाळासाहेब पाटील यांनी वर्चस्व राखले. मात्र, पाल ग्रामपंचायतीची सत्ता मिळवून मनोज घोरपडे यांनी त्यांना हादरा दिला. कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपचे अतुल भोसले यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्या गटाशी जोरदार लढत दिली आहे. या मतदारसंघातील काले, कार्वे, शेरे या मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपने सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील आजी, माजी आमदारांना आपल्याकडे घेऊन
चौकट..
पाल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला हादरा
कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या पाल गावात सत्तांतर झाले. माजी सभापती देवराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या २५ वर्षांच्या सत्तेला जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने जोरदार धक्का देऊन सत्तांतर करुन दाखवले आहे.
चौकट..
संगम माहुलीत सागर शिवनामे किंगमेकर
सातारा तालुक्यातील संगम माहुली ग्रामपंचायतीत विरोधकांनी आक्षेप घेतल्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर शिवनामे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला होता. मात्र, या निवडणुकीत तीर्थक्षेत्र संगम माहुली विकास पॅनलने ९ पैकी ५ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. येथे सागर शिवनामे हे किंगमेकर ठरले.
चौकट..
वाठार किरोलीत भीमराव काका बाजीगर
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोलीत असलेल्या राष्ट्रवादीच्या सत्तेला काँग्रेसने खिंडार पाडले. जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील हे या निवडणुकीत बाजीगर ठरले आहेत.
चौकट..
ल्हासुर्णेत शशिंकांत शिंदे यांना हादरा
मागील विधानसभा निवडणुकीत शशिंकांत शिंदेंचे होमपिच असलेल्या ल्हासुर्णे गावातूनच त्यांना आमदार महेश शिंदे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यात सुधारणा झाली नाही. ल्हासुर्णेची ग्रामपंचायत आ. शशिकांत शिंदे यांच्या हातून निसटली आहे. देऊर, वाठार स्टेशन आणि सातारारोड ग्रामपंचायतींतही सत्तांतर झाले.