म्हसवड : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाची चैत्री कावड यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू झाली. धार्मिक कार्यक्रमांसह गुढी उभारून या यात्रेस प्रारंभ झाला. यात्रेमुळे शिंगणापूरमध्ये चैतन्याच वातावरण असून, सर्वत्र हरहर महादेव, असा जयघोष ऐकावयास मिळत आहे. यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू होते ती सलग पोर्णिमेपर्यंत सुरूच असते. दरम्यान, दि. ७ रोजी मुंगी घाटातून मानाच्या कावडी येणार आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवीन संवत्सरास प्रारंभ होत असल्याने यानिमित्त शंभू महादेवाची विधिवत पूजा करून देवाचे सालकरी आणि देवस्थान कमिटीमार्फत मंदिरात गुढी उभारण्यात आली. त्यानंतर शंभू महादेव आणि पार्वती यांच्या विवाहासाठी लागणारी हळद गावातील सुवासिनींच्या हस्ते उत्साहात पारंपरिक पद्धतीने दळण्यात आली. या यात्रेस देवाच्या हळदीच्या कार्यक्रमाने सुरुवात होते. शिवपार्वतीच्या हळदीचा कार्यक्रम दि. १ एप्रिल रोजी असून, या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात होईल. दि. ४ एप्रिल रोजी अष्टमीच्या दिवशी शिवपार्वती विवाह सोहळा आहे. सायंकाळी ध्वज बांधण्याचा सोहळा पार पडणार आहे. चैत्र शुद्ध एकादशी दि. ६ एप्रिल दिवशी इंदौरचे मानाचे काळगौडा राजे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यानंतर दि. ७ एप्रिल रोजी मुंगी घाटातून मानाच्या कावडी वर चढून महादेवला जलाभिषेक घालण्याचा सोहळा पार पडणार आहे. मुंगी घाटातील सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक शिंगणापूरमध्ये मुंगी घाटात दाखल होतात. हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहतात. (प्रतिनिधी)
शिंगणापूरच्या शंभू महादेव यात्रेस प्रारंभ
By admin | Published: March 29, 2017 11:39 PM