प्रमोद सुकरे
कराड- सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागितले जात आहे. याबाबत शंभूराज देसाई यांना बुधवारी माध्यमांनी छेडले. त्यावर तो अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सध्या माझ्याकडे सातारा व ठाणे या दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दोघे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे शंभूराजे देसाई यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे राज्यात तीन चाकी सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे मंत्रीपदे, पालकमंत्रीपद याची समीकरणे आता बदलणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना नुकतेच बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता खाती कधी मिळणार? याची प्रतिक्षा आहे. तसेच कोण कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री होणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
अजित पवार आणि आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी आपणासह सहकार्यांना चांगली खाती मिळावी म्हणून प्रयत्न सुरु ठेवले आहेत.तसेच राष्ट्रवादीकडून सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असल्याच्या चर्चा आहेत.या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराजे यांना छेडले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असे मत व्यक्त केले. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण असणार? याबाबत उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.