सातारा - शिवसेनाप्रमुख राष्ट्रपुरुष असून देशातील हिंदू विचाराचे दैवत आहेत. त्यामुळे ते कोणाची खासगी मालमत्ता नाही. त्यांचा वारसा घेऊनच आम्ही पुढे जात आहोत, अशी टीका राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आमच्या आमदारांच्या मनात काय चालले आहेत ते समजायला, जयंत पाटील मनकवडे आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
सातारा येथील स्वराज मंगल कार्यालयात शिवसेनेच्या शिंदे गट हिंदू गर्व गर्जना यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार, संपर्क प्रमुख शरद कणसे, चंद्रकांत जाधव, वासूदेव माने, एकनाथ ओंबळे, रणजित भोसले, शारदा जाधव आदी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘मागील अडीच वर्षात राज्यात आपलेच सरकार होते. पण, आपल्याला इच्छा नसताना हिंदुत्वापासून दूर राहावे लागले. मुख्यमंत्री आपला असतानाही बोलायला मर्यादा होत्या. मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे मुस्कटदाबी होत होती. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बोलत होतो. पण, सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला सरकार चालवायचं आहे, असे त्यांच्याकडून सांगितले जात होते. त्यामुळे कामंही होत नव्हती. वित्त खात्याचा मंत्री असतानाही मतदारसंघात निधी आणता आला नाही. त्यामुळे शोभेची पदं घेऊन बसायचं का हा प्रश्न होता. माणसं विरोधातून सत्तेत येतात. पण, आम्ही नऊजण सत्तेतून बाहेर पडलो. कारण, आम्हाला शिवसेना वाचवायची होती. आम्ही सरकारमध्ये राहिलो असतो तर पुढील दोन वर्षात शिवसेना संपली असती.
शिवसेनेच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा ५ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. यासाठी जिल्ह्यात नियोजन करा अशी सूचना करुन मंत्री देसाई पुढे म्हणाले, दसऱ्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सोने लुटणार आहे. मेळाव्यासाठी तालुका, मतदारसंघात बैठका घ्या. कितीही वाहने लागू द्या. सुरक्षित माघारी आणण्याची जबाबदारीही माझी आहे.
आमदार अनिल बाबर म्हणाले, मागील अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना मंत्री असल्याने शंभूराज देसाई यांना ते भेटले असतील. पण, आमदारांना कधी भेटले नाहीत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दोन वर्षे खुर्चीवर बसत नाही, हे पहिलेच उदाहरण ठरले. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास काम करतात. सामान्यांना भेटणारा मुख्यमंत्री आहे. पक्षवाढीबरोबरच विकासकामांसाठी जोर लावावा.
मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यात सत्कार...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऑक्टोबर महिन्यात साताºयात सत्कार कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्याचे पूत्र म्हणून कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहनही मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
राष्ट्रवादीतील मंडळी आमच्या संपर्कात...
कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाना साधला. पाटील यांनी लवकरच राज्य सरकार बरखास्त होईल, असे वक्तव्य केले आहे, याबाबत आपले मत काय असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर देसाई यांनी ‘जयंत पाटील का मनकवडे आहेत का ? आमच्या आमदारांची नाराजी त्यांना समजते. आमच्यातील कोणीही नाराज नाही. या उलट त्यांच्याकडीलच काही मंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यांना तटवून ठेवणे आणि दिलासा देण्यासाठीच हे वक्तव्य केले आहे, असा टोला लगावला.