सातारा : हिंदू नववर्ष असलेल्या गुढी पाडव्यानिमित्त शाहूनगरी सजली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी होते. हे लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनीही दुकानात अनेक आॅफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ दिसली. अनेकांनी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग करून वस्तू घरी नेण्याचे निश्चित केले आहे. पाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणात वाहन, जागा, फ्लॅट, किचन वेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. पाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात कळकाचा वापर होतो. राजवाडा परिसरात दोन-तीन दिवसांपासून कळकाची आवक वाढली असून, ते घेण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे. सायंकाळी राजवाडा, पोवई नाका परिसरात कळक, फुले घेण्यासाठी गर्दी दिसत होती. साखरेच्या वाढलेल्या किमतीचा फारसा परिणाम साखरगाठ्यांवर जाणवला नाही. दहा रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत साखरगाठी बाजारपेठेत आहेत. शहर परिसरात राहणाऱ्या काही ग्रामस्थांनी संध्याकाळपासून राजवाडा आणि पोवई नाका परिसरात कडुनिंब आणून विक्री केली. (प्रतिनिधी)
वर्षारंभासाठी शाहूनगरी सजली
By admin | Published: March 20, 2015 11:44 PM