शंकर पोळकोपर्डे हवेली : अलीकडच्या काही वर्षांत शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करू लागले आहेत. जे पिकेल ते चांगल्या दराने विकेल याचा अंदाज घेऊन कोपर्डे हवेली येथील शेतकरी शरद चव्हाण यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत एक एकर जमीन क्षेत्रावर शेवंती फुलाचे उत्पादन घेतले आहे. मुंबई बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे.तांबडी काळी असणाऱ्या मिश्र जातीच्या जमिनीवर शेवंतीच्या फुलाची २३ फेब्रुवारीला लागण केली होती. सध्या या शेवंतीच्या फुलाचे तोडे सुरू झाले आहेत. एका किलोला मुंबई बाजारपेठेत २३० रुपये किलोला भेटत आहेत. पहिल्या तोड्याला ६७ किलो फुले मिळाली. त्याची विक्री होऊन १५ हजार ४५० रुपये मिळाले. गत वर्षाच्या तुलनेत हा जादा दर आहे.चव्हाण यांना एका एकराला सुमारे दीड लाख रुपये खर्च येणार आहे. पाच फुटी सरीला मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. तपमान, किडीचा प्रादुर्भाव, वाढ यासाठी वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या घेतल्या जातात. शेवंतीची फुले वेगवेगळ्या रंगाची आहेत. एका बाजूला रोगाचे नियंत्रण होण्यासाठी झेंडूच्या फुलांची लागण केली आहे.शेवंती जातीच्या फुलाला बाजारपेठेत चांगली मागणी असते. वेगवेगळ्या सजावटीसाठी वापर केला जातो. दर तीन दिवसांनी फुलांचे तोडे करण्यात येतात. फुलांच्या तोड्यात वाढ होते, तशी जादा फुले मिळतात. पाच ते सहा महिने शेवंतीची फुले राहू शकतात. तर त्याची चांगली जोपासना केली तर शेवंतीचा कालावधी पुढे जाऊ शकतो. उत्पादन खर्च वजा करून कमीत कमी सात लाख रुपये भेटतील, असा चव्हाण यांचा अंदाज आहे.
तोडणीसाठी मजुरांची गरज...इतर फुलांच्या तुलनेत शेवंतीच्या फुलाला चांगली मागणी असते.पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. शिवाय फुले तोडणीसाठी मजुरांची गरज लागते.गेल्या दोन वर्षांपासून कोपर्डे हवेली परिसरातील शेतकरी फूलशेतीकडे वळू लागले आहेत.
पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन प्रयोग म्हणून मी शेवंतीच्या फुलाचे उत्पादन घेतले आहे. मुंबई बाजारपेठेत त्याला चांगला दर मिळत सध्या किलोला २३० रुपये दर भेटत आहे. आतापर्यंत उत्पादन खर्च दीड लाख रुपये आला आहे. अंदाजे नैसर्गिक अडचणी येईना तर सात लाख रुपये मिळतील, असा आमचा अंदाज आहे. - शरद चव्हाण, शेतकरी कोपर्डे हवेली.