सातारा : महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट, मॉल, किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरातून तीव्र विरोध होत आहे. मात्र शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. इतकच नाही तर सरकारच्या या निर्णयाला खंबीर पाठिंबा देखील दिला आहे.द्राक्ष उत्पादकांवर कर्जाचा जास्त बोजा आहे. त्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. वाईनवरील बंधने हटवल्याने शेतकऱ्यांची अगतिकता संपेल. प्रक्रियेसाठी द्राक्षे वापरली गेली तर ती जास्त काळ टिकतील. आत्ताच्या थेट वापर बाजारात पुरवठा कमी झाल्याने भाव वधारतील, अशी शक्यता आहे. तसेच आता खराब द्राक्षे फ़ेकून द्यावी लागतात. त्यांनाही किंमत मिळेल. नुकसान कमी होईल. धान्यापासून दारू करू लागल्यापासून हे सिद्ध झाले आहे.मद्यराष्ट्र होईल ही भीती नसून संधी वाईनला अशाप्रकारे परवानगी दिल्याने रोजगार संधी वाढतील. जनतेला आरक्षणाची गरज नसून शेती किफायतशीर बनवणारी धोरणे गरजेची आहेत. तसेच महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होईल ही भीती खरी नसून ती संधी आहे. महाराष्ट्र मद्य उत्पादक राज्य म्हणून अव्वल बनल्यास शेतमालाचे भाव वाढण्याबरोबर रोजगार, वाहतूक, पॅकिंग, शीतगृह, बाजारपेठ, पर्यटन, मशिनरी व्यवसाय, व्यापार व अनुषंगिक बाबीत उलाढाल वाढेल शिवाय सरकारला कर मिळेल.काजू, करवंदे, जांभूळच्या वाईनने अर्थकारण सुधारेलइतकेच नाही तर डोंगराळ भागातील तरुण पुण्या-मुंबईला रोजगारासाठी जातात. त्यांचे शेतातील काजू, करवंदे, जांभूळच्या वाईनने अर्थकारण सुधारेल. विरोधी पक्षांचा वाईनला विरोध हा राजकीय स्वरूपाचा आहे. शेतकरी मेला तरी चालेल या वृत्तीचा आहे. विरोध करताना ते मद्यराष्ट्र असा घोषणा लावतात, ही दिशाभूल आहे.
'ते' अगोदर बिघडलेलेच मुळात वाईनच्या परवानगीमुळे चंगीभंगी वारकरी धारकरी तेव्हढे बिघडतील. ते अगोदर बिघडलेलेच आहेत. तसे सारे बिघडणार नाहीत. जगात मद्य पिणाऱ्या अनेकांनी नवनवीन शोध लाऊन मानवाचे कल्याण केले आहे. अनेकांनी उत्तम साहित्य निर्मिती केली आहे, असेही शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या देशात सरकारने मद्य घेणाऱ्या अनेकांना पद्मश्रीपासून भारतरत्नपर्यंतचे पुरस्कार दिले आहेत. मद्यपान करणारे अनेक पुढारी, मंत्री, नेते, प्रशासकीय अधिकारी सेवेत कार्यरत आहेत. त्यामुळे वाईनचा बाऊ करू नये. आताही वाईन विक्रीबाबत काही बंधने ठेवली आहेत ती काढून टाकावीत. अन्यथा वाईनच्या समर्थनार्थ श. जोशी प्रणित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. - बाळासाहेब चव्हाण, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना