सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. याबरोबरच ५ उपाध्यक्ष, १५ सदस्य, ६ आजीव प्रतिनिधींसह, ३ आजीव सेवकांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली असून, संस्थेच्या कार्याध्यक्ष, उपकार्याध्यक्ष पदाच्या निवडी २७ मे रोजी पुण्यात होणार आहेत.
रयत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दर ३ वर्षांनी निवडी जाहीर केल्या जातात. सोमवार व मंगळवारी संस्था पदाधिकारी निवडीसंदर्भात शासकीय विश्रामगृह व रयत शिक्षण संस्थेत खा. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या. बैठकीत संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यात खा. पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी वाशीच्या जयश्री चौगुले, उरणचे अरुण कडू पाटील, पी. जे. पाटील, पुण्याचे ॲड. राम कांडगे आणि पलूसचे महेंद्र लाड यांची निवड करण्यात आली. आजीव सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, विनोदकुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांची निवड करण्यात आली. आजीव सेवक प्रतिनिधी म्हणून नवनाथ जगदाळे, प्रा. डॉ. संजय नगरकर, ज्योत्स्ना ठाकूर यांची निवड करण्यात आली.
मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. ॲड. विश्वजित कदम, ॲड. भगीरथ शिंदे, रामशेठ ठाकूर, ॲड. रवींद्र पवार, मीनाताई जगधने, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्रा. सदाशिव कदम, धनाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.