सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आणि पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी कॉफीचं निमंत्रण देत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेलं. दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. मात्र, याबाबत माध्यमांना पालकमंत्र्यांनी कॉफी उशिरा आली म्हणून वेळ झाला, केवळ गप्पा मारल्या, कमरा बंद नव्हताच असे सांगितले. परंतु, विधानसभेचे जवळ येवून ठेपल्या असताना जिल्ह्याचे आजी व माजी पालकमंत्री गळाभेट घेत असतील तर चर्चा तर होणारच ना!
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची भेट घेतली. यापैकी अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते तर पोलिस प्रशासनाच्या कामकाावर आक्षेप नोंदवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे हेही जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी दोघांची गाठ पडताच दोघेहे दोन पावले पुढे चालत गेले. देसाई यांनी कॉफीचे निमंत्रण देत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेले. दोघांमध्ये बैठक झाली.
या बैठकीबाबत माध्यमांनी विचारले असता शंभुराज देसाई म्हणाले, गैरसमज करून घेवू नका. मला राहू द्या की. मी जिल्हाधिकारी कार्यालयात माझ्या बैठकीसाठी आलो असता शशिकांत शिंदे दिसले. आम्ही विधीमंडळात एकत्र काम केले आहे. आम्ही भेटत असतो. त्यात राजकीय असे काही नाही. नमस्कार-चमत्कार झाल्यानंतर त्यांना कॉफीचे निमंत्रण दिले. नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉफी उशिरा आली. म्हणून थोडा वेळ लागला पण ही कमराबंद चर्चावगैरे काही नाही. दालन खुलेच होते. शिपाई आणि अधिकारी ये-जात होते. शशिकांत शिंदे यांना ऑफर द्यायचा अधिकार मला नाही. मी पक्षाचा आदेश पाळतो, असे देसाई म्हणाले.