सातारा : ‘शरद पवारांनी दुष्काळी जनतेवर सातत्याने अन्याय केला आहे. दुष्काळ हटविला तर आपली मते जातील, या भीतीने त्यांनी माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव, पुरंदर तालुक्यांतंील दुष्काळ मिटविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तसेच योजना रखडत ठेवून गरिबाला आणखी गरीब करण्याचे पाप त्यांनी केले आहे. आता ‘पुतणा मावशीचं’ प्रेम दाखवत त्यांनी माण-खटावच्या दुष्काळी भागात जाऊन ‘दुष्काळी पर्यटन’ केले,’ असा हल्लाबोल पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्'ाची टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवार यांनी शुक्रवारी माण-खटावच्या दुष्काळी तालुक्यांचा दौरा केला होता, या अनुषंगाने ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्यावर टीका करण्याइतपत मी मोठा नाही; पण ते चार वेळा मुख्यमंत्री होते. १५ वर्षे सातत्याने त्यांच्याकडे सत्ता होती. जलसंपदा खातेही त्यांच्याकडे होते. माण-खटाव तालुक्यांची त्यांना वाटणारी चिंता आधीच वाटली असती तर १९९७ मध्ये मंजुरी मिळालेली जिहे-कटापूर योजना त्याचवेळी पूर्ण झाली असती. या योजनेतून दुष्काळी तालुक्यांतील २७ हजार हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले असते. माण-खटावातील दुष्काळ हे शरद पवारांचेच पाप आहे. गरिबाला आणखी गरीब ठेवायचे. दुष्काळाच्या आधारावर मते मिळवायची, ती मते वर्षानुवर्षे आपल्यालाच कशी मिळतील, याची तजवीज करायची दृष्ट प्रवृत्ती त्यांची जुनीच आहे. ते देशाचे कृषिमंत्री असताना पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके त्यांना का दिसले नाहीत.’ शरद पवारांवर केलेले आरोप आपण अत्यंत जबाबदारी करत असल्याचे स्पष्ट करत शिवतारे म्हणाले, ‘माण-खटाव तालुक्यांवर दुष्काळ हा पाचवीलाच पुजला आहे. त्यांच्या पुतण्याकडे सत्ता असताना त्यांनी हे काम पूर्ण केले नाही. अनुशेषाचं भूत माथ्यावर घातल्यानं पुरंदर, फलटण, कोरेगाव, माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांनी आपल्या मतदारसंघापुरते बारामतीकडेच लक्ष केंद्रित केले. पाणी जाणीवपूर्वक त्यांनी बारामतीकडे पळविले. त्यांच्या या धोरणामुळे दुष्काळी तालुके अक्षरश: नागवले गेले आहेत.’
शरद पवारांनी केले दुष्काळी पर्यटन
By admin | Published: September 05, 2015 11:22 PM