Ladaki Baheen Yojana : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राज्यात विविध ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महायुतीच्या नेते विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत. या कार्यक्रमातून विरोधकांवर जोरदार निशाणा देखील साधला जात आहे. अशातच भाजपचे साताऱ्याती माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलंय, असं म्हणत जयकुमार गोरेंनीसुप्रिया सुळेंना सुद्धा लक्ष्य केलं.
वडूज येथे भाजपच्या वतीने लाडकी बहीण सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्या सरकारने महिलांना दीड हजार देण्याचा निर्णय आमलात आणल्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. तसेच सुप्रिया सुळेंना फुकटचे खायची सवय लागली असल्याचे गोरेंनी म्हटलं.
"विरोधक सांगतात ही योजना निवडणुकीसाठी काढली आहे. ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार असल्याचे विरोधक सांगतात. मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या पाच वर्षांसाठी ही योजना सुरु केलेली आहे. कुणी कितीही सांगितले तरी त्यांच्या नादी लागू नका. कारण हे सावत्र भाऊ आहेत. सावत्र भाऊ सांगतात बहिणींना फुकटची खायची सवय लावू नका. आमच्या बहिणींना त्यांचा भाऊ हक्काचे देत आहे. कुणी कुणाच्या खिशातून देत नाही. आमच्या बहिणीला १५०० रुपये दिले तर शरद पवारांच्या पोटात दुखायचे कारण काय आहे. मग यांच्या पोटात का दुखत आहे," अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली.
"सगळं फुटक मिळत असल्याचे ते सांगत आहेत. सुप्रिया सुळे सांगतात बहिणांना फुकटची सवय का लावता हे चांगले नाही. सुप्रिया सुळेंना फुकटची खायची सवय आहे," असेही जयकुमार गोरे म्हणाले.
"भाजपप्रणित केंद्र आणि महायुतीच्या राज्य सरकारने महिला, माता, भगिनींसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या सर्व योजनांची अंमलबजावणी सुरू असून लाखो महिलांना त्याचा लाभही मिळत आहेत. महाविकास आघाडीचे शरद पवार, नाना पटोले, उध्दव ठाकरे, वड्डेटीवार हे सावत्र भाऊ या योजनांची खिल्ली उडवत आहेत. आजच्या कार्यक्रमाला झालेली महिलांची तुडुंब गर्दी म्हणजे विरोधकांना चपराक आहे," असं जयकुमार गोरेंनी म्हटलं.