Shashikant Shinde ( Marathi News ) : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने साताऱ्यात शशिकांत शिंदे तर रावेरमध्ये श्रीराम पाटील यांना संधी दिली आहे. साताऱ्यात महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नसली तरी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे इथून उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. पक्षाकडून आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"हा जिल्हा यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचाराचा जिल्हा आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून या जिल्ह्याने पक्षाच्या मागे मोठी शक्ती उभा केली. माझी लढाई कोणा व्यक्तीविरोधात नसणार आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची जी लढाई शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केलीय ती माझी लढाई असणार आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेला, तरुणांना आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असणारं सर्वसामान्यांचं नेतृत्व उभा करण्याचा मी प्रयत्न करेन. या जिल्ह्यात आज अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आवाज उठवणारा खासदार हवा आहे. श्रीनिवास पाटील आणि आधीच्या खासदारांनी जे काम केलं त्यांचा आदर्श घेऊन मी काम करेन," असं आश्वासन शशिकांत शिंदे यांनी दिलं आहे.
किती मताधिक्य मिळणार?
साताऱ्यात मागील लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी सहा महिन्यांतच राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून पोटनिवडणूक लढवली होती. मात्र पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आले. हे मताधिक्य तुम्हाला कायम राखता येईल का, असा प्रश्न आता शशिकांत शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर शिंदे यांनी म्हटलं आहे की, "या निवडणुकीत जनतेच्या मनात एक सुप्त अशा प्रकारची इच्छाशक्ती आहे, सरकारबद्दल नाराजी आहे. सातारा जिल्ह्यात माझ्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक लोकांनी मला फोन केले. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या आणि शरद पवार यांच्यासोबत आहे. आता आमच्यासमोर जे उमेदवार आहेत, ते जेव्हा राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढत होते, तेव्हा ते खासदार झाले. त्यामुळे आता तत्वांचा विषय आहे, माझी आणि त्यांची काही वैयक्तिक लढाई नाही. ही निवडणूक जनतेनं हातात घेतली, तर फार मोठी आणि सर्वांच्या कल्पनेपलीकडची क्रांती होईल," असा विश्वास शशिकांत शिंदेंनी व्यक्त केला.
दरम्यान, "जनतेच्या विश्वासाला सार्थ ठेवून मी जे काम केलंय ते काम पुढेही करणार आहे. पवारसाहेबांनी लढण्याची भूमिका घेतल्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल, असं मी त्यांना सांगितलं होतं. पक्षाने आज माझ्यावर विश्वास दर्शवला असून भविष्यकाळात साताऱ्याचा एक आदर्श खासदार होण्याचा मी प्रयत्न करेन," असंही शशिकांत शिंदे म्हणाले.