वाठार स्टेशन : ‘शरद पवार व अजित पवार हे जाणते नेतृत्व असून, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये संधी दिलेली आहे. आ. शशिकांत शिंंदे यांच्यासारख्या सामान्य माथाडी कामगाराच्या मुलाला थेट आमदार आणि मंत्री बनविले आणि त्यांनी देखील संधीचे सोने केले. अशा या नेतृत्वाला तुम्ही कोरेगाव आणि साताऱ्यात अडकवू नका, त्यांना राज्यभर काम करण्याची संधी द्या, तेच आता सरकारची लक्तरे काढल्याशिवाय शांत बसणार नाहीत,’ असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.आ. शशिकांत शिंंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबवडे संमत वाघोली येथील श्रीराम चौकात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचायत समितीच्या सभापती रूपाली जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश जगदाळे, सभापती अजय कदम, गजानन मोरे, नरसिंग दिसले, नवनाथ सकुंडे, आनंद मुळे, सुनील बनकर, विकास सकुंडे, दीपक गुजर, नीलेश कदम, सुरेश कदम, नागेश जाधव, जयदीप पिसाळ, रूपेश पिसाळ, तानाजी गोळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंडे म्हणाले, भाजपचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांच्या ज्ञानाविषयी मुंडे यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले. महाराष्ट्रातील केवळ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यासुद्धा प्रेम भंगातून झाल्या आहेत, असे सांगितले होते. या राधामोहन यांना माहीत नाही की, शेतकरी आपल्या मायपेक्षा काळ्या आईवर जास्त प्रेम करतो. मुख्यमंत्री म्हणतात, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेवर असताना १५ वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांना मी सांगू इच्छितो की, ‘केंद्रीय कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी तब्बल ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली होती.’ यावेळी सुनील माने, अॅड. नितीन भोसले, किरण साबळे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नीलेश जगदाळे यांनी स्वागत केले. राहुल कदम यांनी प्रास्ताविक केले. भास्कर कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. जयवंत प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेचे पदाधिकारी तसेच कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)विकासासाठी रात्रीचा दिवस करू : शिंदे‘कोरेगाव मतदारसंघातील जनतेने मला खुल्या मनाने स्वीकारले आहे. मी आजवर केवळ जनतेसाठी लढा देत आहे. मोकळ्या मनाने मला जसे ४५ हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून दिले, तसेच काम करण्याची संधी द्या, माझी कशातही कोंडी करू नका,’ असे भावनिक आवाहन आ. शशिकांत शिंंदे यांनी केले. सर्वसामान्य जनतेसाठी रात्रंदिवस एक करून मी विकासाचा पाया रचणार आहे.
शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाची राज्याला गरज
By admin | Published: October 20, 2015 9:37 PM