राजीव मुळ्ये-- सातारा --जन्मत:च कर्णबधिर असलेल्या उत्कर्षा गाडे या अवघ्या तेरा वर्षांच्या जलतरणपटूने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली. कान रुसले तरी साताऱ्याचा ‘आवाज बुलंद’करणारी उत्कर्षा अभ्यासातही अव्वल राहून शिक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.शंभर मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्ण तसेच दोनशे मीटर फ्रीस्टाइल आणि शंभर मीटर फ्रीस्टाइल प्रकारांत रौप्य ही आहे उत्कर्षाची कमाई. कर्णबधिरांसाठी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेत २४ राज्यांतील २२०० खेळाडूंनी भाग घेतला. जलतरणातील एकूण सहभाग २२५ हून अधिक होता. उत्कर्षा यातील सर्वांत लहान खेळाडू. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकणारी. जन्मत:च ८५ डीबी इतका श्रवणदोष असला तरी वडील दीपक आणि आई उमा गाडे यांनी मुलीला विशेष मुलांच्या शाळेत घालायचं नाही, असं ठरवलेलं. वडील सातारा न्यायालयात वकिली करणारे तर आई जिल्हा परिषद शिक्षिका. उत्कर्षाच्या जन्मावेळी उमा फलटण तालुक्यात नेमणुकीस होत्या. दीपक गाडे सातारा-फलटण रोज ये-जा करायचे. नंतर उमा यांना ठोसेघरच्या शाळेत नियुक्ती मिळाली आणि कुटुंब साताऱ्यात वास्तव्य करू लागले.उत्कर्षा दोन वर्षांची होऊनही बोलत नाही, प्रतिसाद देत नाही हे पाहून आईवडिलांनी तिची तपासणी केली, तेव्हा श्रवणदोष लक्षात आला. फलटण-पुणे फेऱ्या दर आठवड्याला सुरू झाल्या. ‘स्पीच थेरपी’द्वारे तिला बोलतं करायचंच, असा चंग उभयतांनी बांधला. चार वर्षांची उत्कर्षा थोडं-थोडं बोलू लागली. पुढे कोल्हापूरच्या शांताश्री कुलकर्णींकडे ‘वाचा वर्ग’ सुरू झाला. ‘सिद्धी’ या बहिणीच्या जन्मानंतर तिच्याशी इतरांप्रमाणेच बोलताना प्रगतीचा वेग वाढला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर बसने जाण्याचा वेळ वाचला आणि उत्कर्षा वडिलांबरोबर पोहायला जाऊ लागली. त्यातूनच पुढे बक्षिसांची मालिका सुरू झाली. सामान्य मुलांच्या स्पर्धेतही ती अव्वल राहिली. आॅलिंपिकवीर राहिली मागेहैदराबादेत दोनशे मीटर फ्रीस्टाइलमध्ये पश्चिम बंगालची रिद्धी मुखर्जी सहभागी होती. ती दोन वेळा आॅलिंपिकला जाऊन आलेली. उत्कर्षाने या गटात रिद्धीला मागे टाकून रौप्यपदक खिशात टाकलं. या यशात तिचे प्रशिक्षक दिनकर सावंत यांचे प्रयत्न मोलाचे. ते मूळचे लिंबचे. बालेवाडीच्या दीड महिन्याच्या सराव शिबिरात त्यांनी खाणाखुणांनी उत्कर्षाला जलतरणातील सर्व ‘स्ट्रोक’ शिकविले.उसळत्या समुद्रालाही केलं वश‘मालवण ओपन सी’ स्पर्धेत सहभागी होऊन उसळत्या लाटांची तमा न बाळगता उत्कर्षा तीन किलोमीटर पोहली. वीस डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या या स्पर्धेत उत्कर्षाने तिसरा क्रमांक पटकावला.आईवडिलांची अपार मेहनतमूकबधिर मुलांच्या शाळेत न घालता ‘वाचा वर्गा’च्या माध्यमातून उत्कर्षाचा विकास करताना तिच्या आईवडिलांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक संघाच्या साह्याने जिल्ह्यातील अशा मुलांसाठी वाचावर्ग आयोजित केला.६५० जणांची नोंदणी झाली; मात्र प्रत्यक्षात १५० मुलेच वर्गाला आली. यातूनच उत्कर्षाच्या पालकांचे वेगळेपण स्पष्ट होते. ‘अबोली’ वक्तृत्वात जिंकलीसामान्य मुलांच्या शाळेत उत्कर्षाला घेण्यास प्रथम नकार देण्यात शाळेचा काहीच दोष नव्हता. अशा मुलांना खास प्रशिक्षणच हवं, हा दृढ समज. पण गाडे यांनी एक वर्षात सुधारणा न झाल्यास उत्कर्षाला अन्य शाळेत घालू, असं लेखी दिलं. उत्कर्षा अशी प्रगत झाली की, शिक्षकच म्हणू लागले, आता दुसरी शाळा नको; कारण दरवर्षी उत्कर्षाचा नंबर पहिल्या तीनमध्ये! विशेष म्हणजे, उत्कर्षाने याच शाळेत चक्क वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बक्षिस मिळवलं.
कान रुसले तरी तिने केला साताऱ्याचा ‘आवाज बुलंद’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2016 12:06 AM