सातारा : गेल्या दीड महिन्यापासून माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं असून उन्हातही हजारो लोक घाम गाळत आहेत. आता या घामाच्या धारानंतर शुक्रवारी सायंकाळी माणमध्ये वळवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे माळरानंही पाणीदार होत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून राज्यात अभिनेता अमिर खान यांच्या पाणी फौंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमुळे राज्यातील अनेक गावं पाणीदार झाली आहेत. सातारा जिल्ह्यातही माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात तर या वॉटर कप स्पर्धेचं तुफान आलं आहे.
यंदाच्या तिसऱ्यावर्षी या तीन तालुक्यातील दिडशेच्यावर गावे सहभागी झाली आहेत. ८ एप्रिलपासून या गावांत वॉटर कप स्पर्धे अंतर्गत श्रमदान सुरू आहे. दररोज हजारो लोक गाव पाणीदार करण्यासाठी काम करत आहेत. तसेच अनेक संस्थांनी आर्थिक मदत दिली आहे. काहींनी पोकलेन, जेसीबीसारख्या मशिनरी देऊ केल्या आहेत. त्यामुळे जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहे.
हे कामच या गावांना पाणीदार करुन जाणार आहे.गेल्या दीड महिन्यापासून कडाक्याच्या उन्हात घामांनी न्हाऊन निघाल्यानंतर आता वरुणराजानेही जलाभिषेक करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर माण तालुक्यातील अनेक गावांत वळवाचा पाऊस झाला. वरकुटे मलवडी, बनगरवाडी, चिलारवाडी, शेनवडी, कुकुडवाड या गावांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या पावसाचे पाणी जलसंधारणासाठी काम झालेल्या ठिकाणी साठले आहे. माळरानावरही जागोजागी पाणी अडले आहे. त्यामुळे लोकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वॉटर कप स्पर्धेंतर्गत काम केल्याचे समाधान वाटत आहे, असे आनंदाने ग्रामस्थ सांगत आहेत.पाणीपातळी वाढणार...बनगरवाडी, वरकुटे मलवडी, कुकुडवाड, चिलारवाडीत वॉटर कप स्पर्धेचं काम चांगलं सुरू आहे. या ठिकाणी डीपसीसीटी, नालाबांध, बंधाºयातील गाळ काढणे, ओढा रुंदीकरणाचे काम झाले आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर झालेल्या वळवाच्या पावसाने पाणी साठले आहे. त्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. उन्हाळ्यात झालेला हा पाऊस उन्हाळी पिकांनाही फायदेशिर ठरणार आहे. तसेच आणखी एखादा पाऊस झाल्यास खरीप हंगामापूर्वीच्या मशागतींना वेग येणार आहे.