सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी राष्ट्रवादीतर्फे बुधवारी शेखर गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून गोरे यांच्यासह सर्व नेत्यांनी अभिवादन केले. त्यानंतर तिथून चालत ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाधिकारी परिसरात राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या ठराविक नेत्यांच्या हट्टामुळे आघाडी झालेली नाही. अजूनही आम्ही आशावादी आहोत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत जुन्या फॉर्म्युल्याप्रमाणे कॉँग्रेसने आघाडी करावी. समविचारी पक्षांनी एकत्रित रहावे, या मताचे आम्ही आहोत. धनशक्तीच्या जोरावर उमेदवार रेटला जात असेल, तर त्याला जिल्ह्यातील थोर नेत्यांच्या विचाराने आम्ही उत्तर देऊ. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही काँग्रेस याठिकाणी कशासाठी हट्ट धरत आहे, हे कळायला मार्ग नाही. दोन्ही काँग्रेसच्या लढतीबद्दल भाजपच्या नेत्यांनी काय टीका केली, याकडे आम्ही लक्ष देणार नाही. त्यांचे संख्याबळ नसतानाही त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना मतदारच उत्तर देतील. शेखर गोरे म्हणाले की, शरद पवार व अन्य नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. माण खटाव येथील दुष्काळी जनतेला यामाध्यमातून न्याय मिळाला आहे. या भागाचे प्रतिनिधीत्व करताना निश्चितच त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. (प्रतिनिधी) दिलीपतात्यांची अनुपस्थिती दिलीपतात्या पाटील यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या टीकेविषयी आणि त्यांच्या अनुपस्थितीविषयी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीत लोकशाही मार्गाने कोणालाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही कोणालाही त्याबद्दल जाब विचारत नाही. पक्षात उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांना आहे, मात्र पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर अशी मागणी करणारे सर्व लोक एकत्रितपणाने उमेदवाराच्या पाठीशी राहतात. पक्षाची ही परंपरा आहे. दिलीपतात्या पाटील यांच्याकडे सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच आष्टा नगरपालिकेची जबाबदारी असल्याने ते आज उपस्थित राहू शकले नाहीत. अजित पवारांच्या गैरहजेरीबद्दल चर्चा गोरे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी नेते अजित पवार उपस्थित राहणार होते, मात्र ते गैरहजर राहिले. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेसुद्धा गैरहजर राहिले. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीवरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राष्ट्रवादीकडून शेखर गोरेंचा अर्ज दाखल
By admin | Published: November 02, 2016 11:36 PM