दहिवडी : माण तालुक्यात राष्ट्रवादीला सर्व सत्तास्थाने शेखर गोरे यांच्यामुळेच मिळाली, तरीही सन्मानाची वागणूक मिळाली नाही. हे असेच घडणार असेल तर पक्ष सोडलेला बरा, अशा संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावर गोरे यांनी दोन-तीन दिवसांत निर्णय जाहीर करू, असे सांगत जोरदार टिकास्त्रही सोडले.
दहिवडी येथील बालाजी मंगल कार्यालयात शेखर गोरे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना तीव्रपणे मांडल्या. राष्ट्रवादीने आपल्यावर केलेल्या अन्यायाचा उहापोह केला.
कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना ऐकल्यानंतर शेखर गोरे म्हणाले, ‘तालुक्यात राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. मला विकत घ्यायचे एवढे सोपे नाही. मला घर नाही म्हणता, त्यांनी माझे सातारा आणि पुण्याचे घर पाहावे. वेळ असेल तर फार्म हाऊसही बघावे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही.’
यावेळी वीरभद्र कावडे, महादेव अवघडे, नगरसेवक प्रशांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाºयांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी सुरेखा पखाले, सोनल गोरे, शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.