दहिवडी : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेखर गोरे बुधवारी (दि. २) सकाळी अकरा वाजता अर्ज भरणार आहेत. विशेष म्हणजे, यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील राष्ट्रवादीची दिग्गज नेतेमंडळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. १५ दिवसांपूर्वीच मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या शेखर गोरे यांच्या उमेदवारीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. गोरे यांच्या नावाबाबत सांगली जिल्ह्यातील काही नेत्यांनी साशंकता निर्माण होईल, अशी वक्तव्येही केली होती; परंतु शेखर गोरे यांची जबाबदारी स्वत: अजित पवार यांनी घेतलेली असल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम देत अखेर मंगळवारी शेखर गोरे यांची उमेदवारी जाहीर झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादी सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, राजेंद्र आण्णा देशमुख, प्रकाश शेंडगे, सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह सातारा-सांगली जिल्'ांतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
शेखर गोरे भरणार आज उमेदवारी अर्ज!
By admin | Published: November 02, 2016 12:25 AM