सागर नावडकर ल्ल शेंद्रे जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणात सातारा तालुक्यातील शेंद्रे गट खुला झाल्याने आगामी निवडणुकीत मोठी चुरस होणार आहे. तसेच उमेदवारी मिळविण्यासाठीही मोठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. पंचायत समितीचे शेंद्रे व दरे खुर्द हे दोन्ही गण आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. शेंद्रे गटातील दोन्ही गण आरक्षित झाल्याने जिल्हा परिषदेसाठी काट्याची टक्कर तर पंचायत समितीसाठी उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव, असे चित्र पाहायला मिळणार आहे. गेली दोन पंचवार्षिक निवडणुकीत शेंद्रे गट व शेंद्रे गण हे खा. उदयनराजे भोसले यांच्या गटाकडे आहेत. तर पूर्वीचा जकातवाडी व सध्याचा दरे खुर्द गण आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाकडे आहेत. शेंद्रे गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव झाला आहे. तर दरे खुर्द हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष उमेदवारासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गणांत खासदार व आमदार यांच्याकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार निवडून येणार, हे निश्चितच आहे. तर याउलट जिल्हा परिषदेसाठी शेंद्रे गट खुला झाल्याने दोन पंचवार्षिकपासून प्रतीक्षेत असणारे अनेक मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. शेंद्रे गटात शेंद्रे, सोनगाव तर्फ बोरगाव, आसनगाव या गावांतील मतदार संख्या जास्त असल्याने या गटावर या गावांचा प्रभाव जास्त असतो. शेंद्रे गट हा गेली दोन निवडणुकीत खासदार गटाकडे असल्याने यावर्षीही तो खासदार गटाकडे राहण्याची दाट शक्यता आहे. शेंद्रे गटामध्ये अजिंक्यतारा साखर कारखाना व कारखान्याचे कार्यक्षेत्र असल्याने यावेळी आमदार गटाकडूनही या गटावर दावा केला जाऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गटासाठी खासदार गटात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होऊ शकते. खासदार गटाकडून जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील काटकर, माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ, अॅड. अंकुशराव जाधव, बजरंग कदम, संजय पोतेकर, संजय साळुंखे असे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. तर आमदार गटाकडून माजी उपसभापती अरविंद चव्हाण, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अजिंक्यतारा सूतगिरणीचे संचालक उत्तमराव नावडकर, सोनगावचे माजी सरपंच विश्वास नावडकर, संतोष कदम, अशोक मोरे यांचे नावे पुढे येत आहेत. तर भाजपकडून शहापूरचे सुभाष माने यांना संधी दिली जाऊ शकते. शेंद्र गटात भाजप व शिवसेनेचे अस्तित्व अत्यंत कमी असल्याने त्यांच्या उमेदवारीचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे; मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काटकर की पडवळ याचीच उत्सुकता जिल्हा परिषदेच्या शेंद्रे गटात उमेदवारीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती सुनील काटकर व पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत पडवळ यांच्यात कोणाला संधी मिळणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांच्या नावाची शेंद्रे गटात जोरदार चर्चा आहे.
शेंद्रे झेडपी गटात जोरदार रस्सीखेच
By admin | Published: October 15, 2016 11:44 PM