पेट्री : स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावलेल्या जावळीच्या खोऱ्यातील लेक सैन्यात कर्तृत्व बजावणार आहे. गांजे येथील शिल्पा चिकणे हिची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड झाली आहे. जावली तालुक्यातून प्रथम महिला सैन्यात भरती होण्याचा मान शिल्पा चिकणे यांना मिळाला आहे.
जावळी तालुक्यातील गांजे येथील पांडुरंग चिकणे या शेतकऱ्याला सहा मुली आहेत. प्राथमिक शिक्षण गांजे गावात घेऊन काॅलेजसाठी शिल्पा मेढा या तालुक्याच्या ठिकाणी जावू लागली.
सैन्यात भरती होण्याचे एकच ध्येय तिच्या डोक्यात होते. त्यादृष्टीने तिने बारावीनंतर परिश्रमाला सुरुवात केली. जावली करिअर ॲकॅडमीमध्ये प्रा. संतोष कदम यांच्याकडे ती कठोर मेहनत घेऊ लागली. संतोष कदम यांनीही घरची परिस्थिती लक्षात घेऊन शिल्पाकडून एक रुपयाही न घेता दत्तक घेतले. अडीच वर्ष त्यांनी शिल्पाकडून कठोर मेहनत करून घेतली. शिल्पानेही घरच्या परिस्थितीचा बाऊ न करता लढत मेहनत घेत होती.
हे करतच शिल्पाने आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातून शिक्षण सुरू ठेवले. ती वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. भारतीय सैन्य दलात जागा निघाल्यानंतर तिने फाॅर्म भरला. शारीरिक फिटनेस परीक्षा कोल्हापूर येथे दिल्यानंतर त्यात तिची निवड झाली. उरण येथे लेखी परीक्षा तर पुणे येथे शारीरिक चाचणी झाली.
तीन ठिकाणी चांगल्या पद्धतीने यश मिळाल्यावर तिची आसाम रायफलमध्ये निवड झाल्याचे कळाल्यानंतर अख्ख्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
शिल्पा सैन्य दलात भरती झाल्याची बातमी गावात व परिसरात समजल्यानंतर तिचे कौतुक केले जात आहे.
कोट-
सैन्य दलात जायचेच, हेच ध्येय आयुष्यात ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्याने यश मिळाले. यामध्ये कुटुंबातली सर्वांनीच प्रोत्साहन दिल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले.
- शिल्पा चिकणे
गांजे, ता. जावळी.
चौकट
शिल्पाचा अभिमान...
माझ्या मुलीने दोन-तीन वर्षांपासून अनेक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु वेळोवेळी आलेल्या अपयशाला न डगमगता तिने मिळवलेल्या यशाचा आम्हा परिवाराला अभिमान आहे. तिच्या हातून भविष्यात घडणाऱ्या देशसेवेचा आनंद मोठा आहे. मी अशिक्षित असून, स्पर्धेसाठी तिने स्वतः केलेले कष्ट व तिच्या प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे,’ अशा भावना शिल्पाचे वडील पांडुरंग बाबूराव चिकणे यांनी व्यक्त केल्या.
आयकार्ड फोटो
२३शिल्पा चिकणे