शामगाव : बोरीवली रेल्वे स्टेशनवर जवानाने प्रसंगावधान राखत चिमुरडीचा जीव वाचविला. सचिन पोळ असे त्या जवानाचे नाव असून, तो कºहाड तालुक्यातील शामगावचा आहे. सचिनने दाखविलेल्या या धैर्यामुळे शामगाव परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
शामगाव येथील सचिन पोळ हा युवक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सध्या तो मुंबईत नेमणुकीस असून, दोन दिवसांपूर्वी तो बोरीवली रेल्वेस्टेशनवर कर्तव्य बजावत होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भिवंडीतील मुहम्मद दिलशहा हे पत्नी व मुलीसह बोरीवली रेल्वे स्टेशनवर आले. दिलशहा दाम्पत्याने धावत्या रेल्वेतच चढण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नी रेल्वेमध्ये गेले. मात्र त्यांची इझरा नावाची चिमुरडी खालीच राहिली. ती रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत असताना खाली कोसळली. रेल्वेचा वेग वाढल्याने ती प्लॅटफॉर्मवरून रुळावर कोसळण्याची व रेल्वेखाली सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दरम्यान, ही घटना कर्तव्यावर असणाऱ्या सचिन पोळ याच्या चाणाक्ष नजरेने हेरली. व क्षणाचाही विलंब न करता तो जवान धावत त्या ठिकाणी गेला. त्याने रेल्वेखाली गेलेल्या चिमुरडीला ओढून बाहेर काढले. मात्र, त्यावेळी त्याचाही तोल गेला. चिमुरडीसह त्याच्याही जीवाला धोका निर्माण झाला असताना सचिनने स्वत:ला सावरत त्या मुलीचा जीव वाचवला. घटनेनंतर तत्काळ रेल्वे थांबवून इझराच्या आई-वडिलांना त्या ठिकाणी बोलावून घेऊन इझराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.