कुडाळ : येथील प्रतापगड साखर कारखान्याची निवडणूक बिनवविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी गटाने व्यूहरचना आखली असून त्याचाच एक भाग म्हणून संचालकांची महत्वाची बैठक कारखाना कार्यस्थळावर बोलविण्यात आली. यावेळी बोलताना सुनेत्रा शिंदे यांनी भावनिक संभाषणावर अधिक भर दिला. त्या म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून माझे राजकीय अस्तित्व संपल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्याविषयी काहीही बोलायचे नसून माझा कोणावरही कसलाही आक्षेप नाही. आगामी काळात होऊ घातलेल्या प्रतापगड कारखान्याच्या निवडणुकीत संचालक मंडळाने सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गटतट बाजूला ठेवून निवडणुकीची प्रक्रिया राबिविली जाईल. ‘प्रतापगड कारखाना तालुक्यातील एकमेव मोठी संस्था असून, कारखान्याचा स्थापनेपासून आजपर्यंतचा खडतर प्रवास सर्वश्रूत आहे. नैसर्गिक व आर्थिक संकटामुळे अडचणीत आलेला कारखाना लिलावापासून वाचविण्यात संचालक मंडळाला यश आले, हीच आमच्या कामकाजाची पोचपावती असून, सभासद व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. काही दिवसांपूर्वी खरेदीविक्री संघातील नाट्याने अनेकांनी माझ्या राजकीय अस्त्विाविषयी चिंता व्यक्त केली. राजकारणात या सर्व गोष्टी घडत असतात. म्हणून कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा कामालालागावे.’ ‘संस्थांचे अस्तित्व कायम अबाधित राहावे यासाठी काम करायचं आहे. निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास असून त्यात अपयश आले तर सर्वांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ. संचालक मंडळाची गेल्या पाच वर्षांमध्ये मोलाची साथ लाभली आहे. आगामी काळातील वाटचालञ सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन केली जाईल,’ असेही त्या म्हणाल्या. यावेळी संचालक दादा फरांदे, अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, उपाध्यक्ष अंकुशराव शिवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक शामराव किर्वे, विश्वासराव बोराटे, गणपतराव पार्टे, बाळासाहेब निकम, विजय शेवते, रवींद्र सावंत, शोभा बारटक्के, ताराबाई पोफळे, भानुदास गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बिनविरोध ‘प्रतापगड’साठी शिंदे गटाची व्यूहरचना
By admin | Published: March 12, 2015 9:58 PM