कोरेगाव : कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या अतितटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनेलने आघाडी मिळविली. दरम्यान, पराभूत झालेल्या दोन उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने सायंकाळी ६.४५ च्या सुमारास फेरमतमोजणीस सुरुवात झाली, रात्री उशिरापर्यंत ती प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे संपूर्ण निकाल सहकार खात्याने राखून ठेवला होता.संघाच्या १५ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. संघाचे २४६३ सभासद मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी २३०२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आणि शांततेत सुमारे ९३.४६ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता कोरेगाव बाजार समिती आवारातील केडर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी युसूफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीस सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता निकाल ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आला.दिवंगत माजी आमदार दत्ताजीराव बर्गे शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार अॅड. अधिराज माने हे केवळ एक मताने पराभूत झाल्याने त्यांनी व राष्ट्रवादीप्रणित महिला उमेदवार शैलजा संभाजी निकम या दोन मतांनी पराभूत झाल्याने त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर फेरमतमोजणीसाठी अनामत रक्कम जमा केल्यानंतर सर्वसाधारण गटातील एक आणि सर्वसाधारण महिला गटातील एका जागेसाठीची फेरमतमोजणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. (प्रतिनिधी)कुडाळ : जावळी खरेदी-विक्री संघाची निवडणूक सुनेत्रा शिंदे गट, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार व जितेंद्र शिंदे यांचा गट अशी तिहेरी अटीतटीची झाली आहे. या निवडणुकीत सुनेत्रा शिंदे गटाने विरोधकांना दारुण पराभव करीत सतराच्या सतरा जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिक लक्ष घातल्यामुळे हा विजय खरा कोणाचा सुनेत्रा शिंदे यांचा की आमदार शशिकांत शिंदे यांचा? अशीच राजकीय चर्चा तालुक्यात निकालानंतर रंगली.संघाच्या निवडणुकीत तीन गट उतरल्याने सुनेत्रा शिंदे यांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र, या निवडणुकीत केवळ आमदार शशिकांत शिंदे यांचे सहकार्य सुनेत्रा शिंदे यांना होते. आमदार शिंदे हे निवडणूक लागल्यापासून ते मतदानप्रक्रिया पार पडेपर्यंत स्वत: राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून होते. (प्रतिनिधी)विजयी उमेदवारसंस्था सभासद प्रतिनिधी मतदारसंघातून हणमंत मुगुटराव शिंदे (३३), नंदकुमार रामचंद्र ससाणे (३३), शंकर तात्याबा कदम (३२), तेजस विठ्ठल कासुर्डे (३१), हरिदास नारायण गोगावले (३१), दत्तात्रय रघुनाथ घाडगे (३१), हणमंत बाबूराव महाडिक (३१), किसन लक्ष्मण धनावडे (३०), तुकाराम यशवंत पवार (३०), नारायण खाशाबा शिंदे (३०), सौरभ राजेंद्र शिंदे (२९). व्यक्तिगत सभासद : आनंदराव बाजीराव मोहिते (१८६), महिला राखीव : विद्या सुनील पवार (२२३), सुनेत्रा राजेंद्र शिंदे (२१२), अनु. जाती : सर्जेराव काळू कांबळे- बिनविरोध, भटक्या जमाती - संजय बाबूराव बोडरे (२२५), इतर मागास प्रवर्ग : नामदेव शंकर फरांदे (२२२).
‘शिंदे’शाही.. कोरेगाव अन् जावळीतही !
By admin | Published: June 16, 2015 1:19 AM