लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : झोपलेल्या अवस्थेत असताना खिशातून पैसे काढल्याच्या रागातून अनुराग सचिन अहिवळे (वय १४, रा. शिंदेवाडी, ता.फलटण) या अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी त्याच गावातील पांडुरंग राजेंद्र पवार (वय २२) याला चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दुहेरी जन्मठेप आणि सव्वा लाखाचा दंड ठोठावला.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, १० नोव्हेंबर २०१५ रोजी सांयकाळी पाच वाजता शिंदेवाडीपासून काही अंतरावर अनुराग अहिवळे याचा अज्ञाताने डोक्यात वार करून खून केला होता. या घटनेच्या काही दिवस अगोदर पांडूरंग आणि अनुरागला एका व्यक्तीने फलटण बसस्थानकात पाहिले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी पांडुरंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. फलटण बसस्थानकात पांडूरंग हा झोपला होता. त्यावेळी अनुरागने त्याच्या खिशातून काही पैसे काढले. हा प्रकार पांडुरंगला समजल्यानंतर त्याने पैसे परत मिळविण्यासाठी अनुरागकडे तगादा लावला. मात्र, अनुरागकडून त्याला पैसे परत मिळत नसल्याने त्याने त्याच्या खुनाचा कट रचला. अनुरागला त्याने फलटण बसस्थानकातून एसटीने काही अंतरावर नेले. निर्जन ठिकाणी अनुरागला नेऊन त्याच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला. असे तपासात निष्पन्न झाले.सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील उर्मिला फडतरे आणि अजित कदम यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.
शिंदेवाडीच्या युवकाला दुहेरी जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:04 AM