पळशी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा लवकरच होत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करून येथील अडीअडचणी सोडवून यात्रा चांगल्यारितीने पार पाडावी, अशा सूचना करतानाच शिंगणापूरचा चार वर्षांत विकास करू,’ असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दि. २० पासून सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिखर शिंगणापूर, ता. माण येथील शंभू महादेवाची यात्रा दि. २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होत आहे. त्यासाठी आयोजित यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते. आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पोलीस उपाधीक्षक शिवणकर, तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी सीमा जगताप, माळशिरस (सोलापूर) तालुक्याचे गटविकास अधिकारी लोखंडे आदी उपस्थित होते.पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘शिंगणापूरची यात्रा उन्हाळ्यात येत असते. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर असते. येथील प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनाही बंद आहे. अशा या पार्श्वभूमीवर पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येत्या २० मार्चपासून येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल.’ यात्राकाळात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केली. तसेच मुंगी घाटाची पाहणी करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेटस लावण्याचीही सूचना केली. नातेपुते, फलटण, दहिवडी मार्गावरील काटेरी झुडपे, साईडपट्ट्या भरण्याबाबतही संबंधितांना सांगितले. अनेकांची गाऱ्हाणी...राज्यातील इतर देवस्थानचा विकास चांगल्याप्रकारे झाला आहे. मात्र, शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव संपूर्ण राज्याचे कुलदैवत आहे. तरीही येथील विकास झालेला नाही. येथील विकास होऊन भाविकांना चांगल्या सेवासुविधा मिळाव्यात, अशी मागणी विविध मान्यवरांनी केली. त्यावेळी पालकमंत्री शिवतारे यांनी काही वर्षांतच येथील विकास केला जाईल, असे स्पष्ट केले.शिंगणापूरचे उपसरपंच राजराम बोराटे यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)
चार वर्षांत शिंगणापूरचा विकास
By admin | Published: March 06, 2015 11:38 PM