खटाव : कोरोना नियमांचे पालन करत येथील लक्ष्मी आईची पाठवणीची मिरवणूक मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. आषाढ महिन्यात येथील लक्ष्मी आईचा उत्सव सुरू होतो. सुवासिनी या महिन्यात मंगळवारी व शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने देवीची खणानारळाने ओटी भरून तिची आळवणी व पूजा करतात.
कोरोनाचे सावट लवकर दूर करून पूर्वीसारखे सर्वांना सुखात राहू दे, अशी आळवणी करत ही पाठवणी मिरवणूक कोरोनाच्या कठीण प्रसंगात गर्दी न करता नियमांचे पालन करत पार पडली. प्रथेनुसार नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी या देवीची पाठवणी करण्याची पद्धत आहे. विधिवत, सर्व धार्मिक विधी करून ही पाठवणी मिरवणूक पार पडली. गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाचे सावट या उत्सवावर असल्यामुळे ही मिरवणूक पायी न काढता लहान ट्रॅक्टरमधून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
यामध्ये देवीचे मानकरी तसेच देवस्थानचे प्रमुख लोक सहभागी झाले होते.