शिरवळ : राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शिरवळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीत खिंडार पडलेले पाहायला मिळाले. भाजप-शिवसेनेला सोबत घेतलेले राष्ट्रवादीचे सुनील देशमुख व राष्ट्रवादीच्या रिजवाना काझी यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये दोघांनाही ९-९ मते पडली. त्यानंतर सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्या निर्णायक मताच्या जोरावर राष्ट्रवादीचे बंडखोर सुनील देशमुख यांनी पुन्हा बाजी मारली आहे.
शिरवळ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक २०१७ मध्ये झाली. राष्ट्रवादीला झटका बसत शिरवळच्या थेट सरपंचपदी भाजप-शिवसेनेच्या लक्ष्मी पानसरे यांची निवड झाली होती. तर राष्ट्रवादीचे बहुसंख्येने सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादीची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली होती. अटीतटीच्या लढतीत एका मताने राष्ट्रवादीचे दिलीप गुंजवटे उपसरपंचपदी निवडून आले होते. त्या वेळी राष्ट्रवादीच्या ठरलेल्या सूत्रानुसार दिलीप गुंजवटे यांनी एक वर्षानंतर उपसरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक घडामोडी घडत राष्ट्रवादीचे सुनील देशमुख हे उपसरपंचपदी विराजमान झाले होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रानुसार व अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सुनील देशमुख यांनी २६ फेब्रुवारी रोजी उपसरपंचपदाचा राजीनामा तब्बल अडीच वर्षांनंतर दिला होता. या वेळी पडद्यामागून अनेक हालचाली होत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरवळच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी जाहीर केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीला खिंडार पडत राष्ट्रवादीत बंडाळी होत राष्ट्रवादीचे सुनील देशमुख, प्रकाश परखंदे, संतोष खुडे, तसेच सहयोगी सदस्या मंगल क्षीरसागर, शिवसेनेच्या रुपाली गिरे, ज्योती चव्हाण यांनी पुन्हा भाजप-शिवसेना गटाकडे कूच केली. राष्ट्रवादीसह आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे यांना धक्कातंत्र बसत प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेचे प्रदीप माने, विजय गिरे, भाजपचे अनुप सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीला धोबीपछाड देण्यासाठी तयारी केली होती.
दरम्यान, सोमवारी सरपंच तसेच निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मी पानसरे, निवडणूक निरीक्षक डॉ. दर्शन काकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बबबनराव धायगुडे यांच्या निरीक्षणाखाली निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सुनील देशमुख तर राष्ट्रवादीतर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरवळ शहराध्यक्ष समीर काझी यांच्या पत्नी रिजवाना काझी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज छाननीनंतर झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत दोघांनाही नऊ-नऊ मते मिळाली. यावेळी सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी निर्णायक मत भाजप-शिवसेना आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुनील देशमुख यांच्या पारड्यात टाकल्याने सुनील देशमुख हे एकामताने उपसरपंचपदावर पुन्हा विराजमान झाले.
देशमुख यांचा निवडीनंतर निवडणूक निरीक्षक डॉ. दर्शन काकडे, सरपंच लक्ष्मी पानसरे, ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
छायाचित्र
शिरवळ उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर डॉ. दर्शन काकडे यांच्या हस्ते सुनील देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच लक्ष्मी पानसरे, बबनराव धायगुडे, प्रदीप माने, विजय गिरे उपस्थित होते. (छाया : मुराद पटेल, शिरवळ)