वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा असलेले गड, किल्ले आजही मोठ्या थाटात उभे आहेत. किल्ले पांडवगड, चंदन-वंदनगड, वैराटगड, किल्ले केंजळगड, कमळगड आपल्याला आवाज देत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या गडांची दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने ‘भटकंती सह्याद्रीची’ या ग्रुपच्या युवकांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.
यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत रायरेश्वर, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड, चंदनवंदन गडांचे अनेक वेळा श्रमदान करून संवर्धन केले.
सौरभ जाधव म्हणाले, ‘किल्ल्यावर ढासळलेली तटबंदी, ढासळलेले बुरूज, वाढलेली झाडे-जुडपे पाहायला मिळत आहेत. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात त्या गडकोटांनी आपली रक्षा केली, आता त्यांचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारे किल्ले संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल.
आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची. आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे जिथे ज्या ज्या संस्था गड किल्ले संवर्धन काम करत आहेत, त्यांच्यावर संवर्धन काम करणे, तसेच आपण गड किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करतात.
सर्व किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान आहे. किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले रायरेश्वर, पांडवगड, केंजळगडला भटकंती सह्याद्रीची या संस्था हातात हात घालून एकजुटीने गडकोट संवर्धन चळवळीत सामील झाल्या आहेत. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, सिद्धेश सूर्यवंशी, अनिकेत वाडकर, ओंकार वरे, आशिष शिंदे, अनिल वाशिवले अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक सक्रिय भाग घेत असतात.
गतवैभव प्राप्त करून देणार
सह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान आहेत. येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आद्य कर्त्यव्य आहे. या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भटकंती सह्याद्रीची सदस्यांनी केले आहे.
१८वाई-किल्ले गटकोट
वाई तालुक्यातील भटकंती ग्रुपच्या सदस्यांनी गटकोट संवर्धनाचा संकल्प केला आहे. यामध्ये शेकडो तरुण सहभागी होत आहेत. (छाया : पांडुरंग भिलारे)