म्हसवड : माण बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने कोणाशीही आघाडी, युती न करता, कोणतीही सत्ता नसताना, पक्षाचे हक्काचे मतदान नसताना लक्षवेधी मतदान घेतले आहे. या निवडणुकीत शिवसेनेनेे मताचा टक्का वाढवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
माण बाजार समितीवर आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-रासप युतीच्या पॅनलने दहा जागा जिंकत समितीची सत्ता राखली आहे, तर राष्ट्रवादी, काँग्रेस, अनिल देसाई गटाने एकत्र लढूनही त्यांना सातच जागांवर समाधान मानावे लागले. शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नसली तरी त्यांनी सोसायटी मतदारसंघातून २३५ च्या आसपास घेतलेली मते विरोधकांना विचार करायला लावणारी आहेत.
बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत शेखर गोरे राष्ट्रवादीत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. त्यावेळी त्यांना ९ व विरोधकांनाही ९ जागा मिळाल्या होत्या. समान मतांमुळे चिठ्ठीवर निवडी करण्यात आल्या. यात सभापतिपद आमदार गोरे गटाकडे, तर उपसभापतिपद राष्ट्रवादीकडे आले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचीही बाजार समितीतली ताकद शाबूत राहिली. त्यामुळे बाजार समितीत आमदार गोरे व राष्ट्रवादीची ताकद मजबूत समजली जात होती. शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेमधील बाजार समितीचे मतदार म्हणून कोणीच नव्हते. कोणतीही सत्ता नसताना, त्यांनी कोणाशीही युती न करता पक्षबांधणीसाठी स्वतंत्र पॅनल टाकण्याचा निर्णय घेतला.
ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघात विचारांचे मतदान नसल्याने त्यांनी दुर्लक्ष करत सोसायटी मतदारसंघातच विशेष लक्ष घातले. सोसायटीमधील मतदारांच्या घरापर्यंत, शेतापर्यंत पोहोचत त्यांनी बाजार समिती निवडणुकीत मदत करण्यासाठी आवाहन केले. मतदारांनी प्रतिसाद दिला. निवडणुकीत त्यांच्या जमेची बाजू एक झाली की. बाजार समितीत शिवसेनेचे एकही मत नसताना २३५ च्यावरती शिवसेनेचे मतदान तयार झाले.
चौकट
नियोजन समितीवर घेतल्यामुळे शिवसेना चार्ज...
माण मतदारसंघातील मरगळलेल्या शिवसेनेला शेखर गोरेंच्या नेतृत्वामुळे झळाळी आली आहे. पक्षहित समोर ठेवून कार्यकर्त्यांची फळी तयार केल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिवसेनेच्या कोट्यातून शेखर गोरे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेतले. त्यामुळे माण मतदारसंघातील शिवसेना चार्ज झाली आहे.
चौकट
बाजार समिती संकटात असल्याने सुरुवातीला निवडणूक बिनविरोध करावी यासाठी आवाहन केले. मात्र, सत्तेसाठी हपापलेल्या विरोधकांनी निवडणूक लावली. भाजप-रासपने युती केली, तर राष्ट्रवादीतील काहींनी त्यांना छुपा पाठिंबा दिला. राष्ट्रवादी, काँग्रेस व अनिल देसाई व आमचं ठरलंयमधील काही नेत्यांच्या गटाने आघाडी करून निवडणूक लढवली. स्वबळावर लढत देत बाजार समितीत शिवसेनेचे एकही मतदान नसताना २३५ मतदान घेऊन दाखवले आहे.
- शेखर गोरे.