सातारा: आगामी लोकसभेच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहे. भाजप आणि सेना युती असताना सातारालोकसभा शिवसेनेने लढवली आहे. १९९६ मध्ये हिंदूराव निंबाळकर हे शिवसेनेतून खासदार झाले होते. एक अपवाद वगळता ही जागा नेहमीच शिवसेनेकडे राहिली आहे. गतवेळी चार लाखांहून अधिक मते शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच द्यावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. कार्यकर्त्यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचविणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, शिवसेनेचे संपर्क नेते विजय शिवतारे यांनी दिली.
शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, एकनाथ ओंबाळे, शारदा जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विजय शिवतारे म्हणाले, सातारा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. सध्याचे खासदार राष्ट्रवादीचे असले तरीही राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडे ९० टक्के कार्यकर्ते असून, शिवेसेनेची मोठी ताकद आहे. शिवसेनेकडे हक्काची मतपेटी असल्याने ही जागा शिवसेनेलाच घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बैठकीत मागणी करणार आहे. ही जागा कोणालाही मिळाली तरीही येथे महायुतीचा उमेदवारच विजयी होईल.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भर दिला. तीच कार्यपद्धती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगीकारली आहे. त्यामुळेच स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहे. त्यामुळे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर दिसेल. आगामी काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे स्थानिक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. सभासद नोंदणी कार्यक्रमही राबवत आहोत. जिल्ह्यात २ हजार ९९८ बुथ असून, प्रत्येक बुथवर शिवसेनेचा बुथप्रमुख नेमणार आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.
माझ्यामुळे पार्थ पवार पडले
अजित पवार यांनी माझा सांगून पराभव केला. तथापि, माझ्यामुळेही काही राजकीय मर्यादांचे उल्लंघन झाले. लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मी बारणेंचा मुख्य प्रचारक होतो. त्यामुळे पार्थ पवार यांचा पराभव झाला. माझ्या पराभवामागे ही पार्श्वभूमी आहे. परंतु, आता अजित पवार आमच्या सोबत आहेत. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असे शिवतारे म्हणाले.