ढेबेवाडी : ढेबेवाडी व कुंभारगाव विभागातील बहुतांश ग्रामपंचायतींवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गटाने म्हणजेच शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गाव असलेल्या कुंभारगाव ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागला असून उंडाळकर-चव्हाण गटाने येथे राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे.
कुंभारगावात स्थानिक पातळीवर झालेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटाची युती मतदारांनी नाकारली आले, तर विभागातील काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता शिवसेनेचा रथ चौफेर उधळल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवरही शंभूराज देसाई गटाचेच वर्चस्व असल्याचे संबंधित ग्रामपंचायतींंच्या प्रतिनिधींनी जाहीर केले आहे.
ढेबेवाडी, कुंभारगाव विभागाकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले होते. त्यातच ज्यांनी राज्याचे आणि केंद्रात नेतृत्व केले ते माजी मुख्यमंत्री आमदार प्रथ्वीराज चव्हाण यांच्या कुंभारगावातही धुमशान होते. येथे राष्ट्रीय कॉंग्रेसचे चव्हाण-उंडाळकर गट एकत्र आल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी हातमिळवणी केली. मात्र, मतदारांना हे मान्य न झाल्यानेच राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मतदारांनी स्वीकारले. चव्हाण-उंडाळकर गटाने सात जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर विरोधी गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले.
मोरेवाडी, उमरकांचन, जानुगडेवाडी, निगडे, धामणी, बाचोली, शिद्रुकवाडी, पवारवाडी, काढणे, काळगांव, मानेगाव, चव्हाणवाडी-धामणी आदी ठिकाणी शिवसेनेने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे, तर कुठरे, करपेवाडी, चिखलेवाडी या ग्रामपंचायतींंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकविला. खळे आणि गुढे या दोन ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या असल्या तरी यामध्ये निवडून आलेल्यांमध्ये शिवसेनेच्याच सदस्यांची संख्या जास्त आहेत. एकूणच विभागातील काही अपवाद वगळता बहुतेक ग्रामपंचायती भगव्या झाल्या आहेत.
- चौकट
अनेक दिग्गजांना धक्का; नव्या नेतृत्वांना स्वीकारले
स्थानिक पातळीवर झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसला. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय देसाई, बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. तर नव्यानेच पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्या योगेश पाटणकर आणि राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखविल्याने कुंभारगावची समीकरणे भविष्यात निश्चितच बदलाचे संकेत देत आहेत.