वडूज , दि. २६ : सोयाबीन पिकाची हमीभावाने खरेदी करा, या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी वडूज येथील खरेदी-विक्री संघावर मोर्चा काढला. तसेच कार्यालयात अधिकाऱ्यांच्या टेबलवरच सोयाबीन ओतून शासनाचा निषेध केला. त्यानंतर काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुुख प्रताप जाधव, उपतालुका प्रमुख रामदास जगदाळे, अमिन आगा, मुगूटराव कदम, महिला प्रमुख सुमित्रा शेडगे, अजित पाटेकर, आस्लम शिकलगार, धीरज वाघ, अशोक सावंत आदी उपस्थित होते.
शासनाचे फसवे धोरण आणि हमीभाव केंद्र नावाखाली शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक होत आहे. तर खरेदी करताना लादण्यात आलेल्या जाचक अटी तातडीने शिथिल कराव्यात, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी संबंधितांना दिले. खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक बबनराव बनसोडे, बाजार समितीचे व्यवस्थापक शरद सावंत, अशोक पवार, हणमंत मदने आदींनी निवेदन स्वीकारले.
सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना दर नसल्याने शिवसैनिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ या संस्थांनी हमीभावाने मालाची खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.