सातारा : रस्ता रुंदीकरणात आड येणारी अतिक्रमणे काढताना दुजाभाव सहन केला जाणार नाही. तसेच रस्त्यात येणाऱ्या सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचा अपवाद केला जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे सातारा विभाग संपर्कप्रमुख नरेंद्र पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे. गोरगरिबांचे संसार निर्दयीपणे उद््ध्वस्त करणारी शासनयंत्रणा धनदांडग्यांच्या पुढे हतबल होणार असेल, तर शिवसेनेच्या पद्धतीने धडा शिकविला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, रस्ता रुंदीकरणाचे काम होणे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक असून, अतिक्रमण काढताना किंवा आवश्यक असणारी जागा ताब्यात घेताना कोणत्याही परिस्थितीत दुजाभाव केला जाऊ नये. सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे. पोवई नाक्यावरील अनेक दुकाने अतिक्रमणात असून, तेथे पथकाची कारवाई का केली जात नाही? विशिष्ट व्यक्तींचे व्यापारी प्रकल्प पूर्णत्वाकडे आल्यावरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवून टपरीधारकांना उद््ध्वस्त का केले जात आहे, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. प्रार्थनास्थळे हटविण्याबरोबरच नाल्यांचे बांधकाम सरळ रेषेत व रस्त्याच्या कडेनेच करण्यात यावे, अशी मागणी करून पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या, महामंडळांच्या तसेच पालिकेच्या सर्व खुल्या जागांमध्ये शक्य होईल तितक्या फेरीवाल्यांना, फळविक्रेत्यांना सामावून घ्यावे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास प्रशासनाला तीव्र जनक्षोभास सामोरे जावे लागेल आणि अतिक्रमण हटाव मोहिमेचे काम करू दिले जाणार नाही, असा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा इशारा : गरिबांचे संसार उद्ध्वस्त करून धनिकांना सूट का?
By admin | Published: February 01, 2015 10:38 PM