वाई : कोरोनाच्या वैश्विक संकटाने जगभर थैमान घातले आहे. राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्य शासनाने १५ ते ३० एप्रिल कडक निर्बंधासह लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे, अत्यावश्यक सेवा वगळून बाकीच्या सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यास बंदी असल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या सर्वसामान्य लोकांना दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला असून, यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये रोज दोन लाख शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. यानुसार, सर्वसामान्य नागरिकांना झोपडपट्टी, तसेच गरीब नागरिकांना याचा चांगला मदत होऊन वाईमध्येही मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ होताना दिसत आहे. रोज साधारणपणे दीडशे भोजन थाळ्यांचे वाटप गरजू नागरिकांना केले जात असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सामान्य नागरिक सकाळपासूनच शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे असतात. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वाटप करण्यात येत असते.
कोट..
वाई येथील शिवभोजन थाळी केंद्रात दररोज दीडशे शिवभोजन थाळ्यांचे मोफत गरिबांना वाटप करण्यात येत असून, शासनाने दिलेल्या नियमावलींचे कडक पालन करण्यात येत आहे.
- चंद्रकांत मातारे, शिवभोजन केंद्र चालक
१८वाई
वाई येथे सामान्य नागरिक सकाळपासूनच शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभे असतात.