खटाव : खटावमध्ये शिवजयंती उत्सव कोरोनाच्या नियमांचे पालन करत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान, शिवजयंतीनिमित्ताने शिवप्रेमी युवकांनी आणलेल्या ज्योतीचे स्वागत गावातील चौका-चौकात करण्यात आले.
छत्रपती शिवाजी मंडळ बाहेरील आळी येथे देखील युवकांनी गडावरून आणलेल्या शिवज्योतीचे पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वेषभूषा परिधान केलेल्या युवतींनी मिरवणुकीने शिवज्योत गावात आणून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला.
भगव्या पताका, भगवे झेंडे आदींनी परिसर भगवा झाला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी चौक दुमदुमून गेला होता. चावडी चौकात ज्योत आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने चौक दुमदुमून गेला होता. कोरोनाचे वाढते संकट पाहता, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करत जास्त गर्दी न करता शांततेत कार्यक्रम पार पडला.