सातारा : भगवे ध्वज अन् भगव्या पताका, पारंपरिक वाद्यांचा गजर, ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयघोष, शिवपराक्रमाचा इतिहास जागविणारे पोवाडे अन् मावळ्यांनी केलेली साहसी प्रात्यक्षिके अशा उत्साही वातावरणात जिल्ह्यात शिवजयंती साजरी करण्यात आली. सातारा शहरात जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शाही मिरवणुकीत सहभागी झालेले बाल मावळे व चित्ररथांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीच्या पूर्वसंध्येलाच सातारा शहर भगवे झेंडे व भगव्या पताकांनी शिवमय झाले होते. शहरातील चौकाचौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रविवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील हजारो शिवभक्त अजिंक्यतारा व प्रतापगड किल्ल्यावरून शिवज्योत पेटवून पुन्हा आपल्या गावी मार्गस्थ होत होते.
सातारा शहरात सोमवारी सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी झालेले बाल मावळे व चित्ररथ पाहण्यासाठी राजपथावर नागरिकांची गर्दी लोटली होती. मिरवणुकीत शालेय मुलांनी शिवकालीन वेशभूषा परिधान केल्यामुळे वातावरण शिवमय झाले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला. गांधी मैदानात विद्यार्थ्यांनी पोवाड्याचा कार्यक्रमही सादर केला.सातारा पालिकेच्या वतीने यंदा शिवजयंती उत्सव थाटात करण्यात आला.
गांधी मैदानातून शिवरायांची प्रतिमा असलेली व फुलांनी सजविलेल्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेविका स्मिता घोडगे, सुजाता राजेमहाडिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.म्हसवडमधील मिरवणुकीत शिवप्रेमींचा मोठा सहभागम्हसवड शहर व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातून शाही मिरवणूक काढण्यात आली. भगवे फेटे धारण केलेल्या शिवप्रेमींचा या मिरवणुकीत विशेष सहभाग होता.म्हसवडमध्ये सोमवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा येथील मुलींचा सहभाग असलेल्या झांजपथकाच्या आवाजाने सारा परिसर दुमदुमुन गेला होता.भगवे निशाण, फेट्यांमुळे मिरवणुकीत भगवे वातावरण निर्माण झाले होते. या मिरवणुकीत शहरातील नागरिक सहभागी झाले होते.शिवबा साऱ्यांचाच... सर्व जाती-धर्मातील अठरापगड मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणाºया छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजही प्रत्येकाला आदर वाटतो, याचं जिवंत उदाहरण सोमवारी साताºयात दिसलं. बाल शिवाजीच्या रुपातील आपल्या लाडक्या लेकराला घेऊन शिवजयंती मिरवणुकीत निघालेली ही मुस्लीम समाजातील महिला हजारो सातारकराचं लक्ष वेधून घेत होती.