प्रगती जाधव-पाटीलसातारा : मध्यवर्ती युवा महोत्सवात सादरीकरणासाठी मिळालेल्या संधीचे सोने करण्याची धडपड प्रत्येक संघात बघायला मिळते. मिळेल त्या ठिकाणी आणि असेल त्या अवस्थेत पाठांतराबरोबरच नृत्य आणि अभिनयाचा सराव करताना विद्यार्थी महोत्सव स्थळी दिसत होते. कोणाला पराभूत करण्यापेक्षा स्वतः विजयी होण्यासाठी मुलांनी अक्षरशः रात्र जागविली.दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजकडे ४३व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे यजमानपद आहे. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या उत्साहाची अलोट गर्दी अनुभवायला मिळत आहे. सराव पूर्ण झाल्यानंतर अंतिम कला सादर करण्यापूर्वी रंगमंचाचा अंदाज घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे दिवसभर रंगमंचाच्या आसपास राहून दिवसभरातील कार्यक्रम विद्यार्थ्यांनी अनुभवले. बुधवारी रात्री पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादरीकरणाचा सराव सुरू केला.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भल्या पहाटेपर्यंत विद्यार्थ्यांचा हा सराव सुरू होता. एक-दोनदा सराव केल्यानंतर प्रत्येकाला पुढच्या स्पर्धकांसाठी रंगमंच उपलब्ध करून द्यायचा होता. त्यामुळे आवश्यक तेवढे सराव रंगमंचावर करून विद्यार्थी परतले. पहाटेपर्यंत सरावाचा हा आवाज कोणत्याही संगीताशिवाय सुरू होता, हे विशेष.
ना इर्षा ना गेमा!मध्यवर्ती युवा महोत्सवात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून स्पर्धक सहभागी झाले आहेत. विविध कलाविष्कार सादर करताना परस्परांना प्रोत्साहन देण्याची तरुणाईची स्टाईल वाखाणण्याजोगी होती. आपापला प्रयोग झाला की, प्रेक्षकांमध्ये बसून आपल्यापेक्षा कोणाचा कलाविष्कार चांगला झाला, याची चर्चा करण्याबरोबरच रंगमंचावर असणाऱ्या स्पर्धकांना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रोत्साहन देत होते.
‘व्हायरल’चा फटका कलावंत विद्यार्थ्यांनाही!युवा महोत्सवासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना व्हायरल आजारांनी घेरले होते. सुमारे महिनाभर सराव केल्यानंतर आता स्वतःच्या बदली अन्य कोणताही पर्याय देणे अशक्य होते. काही जिगरबाज कलावंतांनी आदल्या दिवशी चक्क सलाईन लावून दुसऱ्या दिवशी आपली कला सादर केली. प्रेक्षकांच्या समोर कला सादर करताना देहभान हरपून केवळ सर्वोत्कृष्ट सादरीकरण करण्याचे ठरवून विद्यार्थ्यांनी सांघिक भावनेचे दर्शन घडविले.