शिरवळ : शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पूर्वीच्या झालेल्या चुलत भावाची भांडणे मिटविण्याचा राग मनात धरून एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. हणमंत रामचंद्र तालवर (वय ३३, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. फरार दोघांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात व रुग्णालयात परिसरात धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ, ता. खंडाळा येथील एका फर्निचरच्या दुकानामध्ये हणमंत रामचंद्र तालवर हा फर्निचर घरी पोहोचवण्याचे काम करतो. यावेळी संबंधित फर्निचरच्या दुकानात मोटारसायकलवरून दोघेजण आले. यावेळी त्याठिकाणी असलेल्या कामगाराला ‘आम्हाला कपाट पाहायचे आहे,’ असे सांगितले त्यानंतर संबंधित कपाटे दाखविल्यानंतर ते दुकानामधील काऊंटर समोर आले. यावेळी हणमंत तालवर हा काऊंटरसमोर बसला होता. यावेळी त्या दोन जणांमधील वैभव जोतिबा शिवतरे याने हातामधील कोयत्याने अचानक हणमंत तालवर यांच्या मानेवर, डाव्या दंडावर, डाव्या हाताच्या काखेत, डाव्या कंबरेवर वार केले. अचानक हल्ला झाल्याने तेथील उपस्थितांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. यावेळी हणमंत व वैभव यांच्यामध्ये झटापट झाली. यावेळी वैभव सोबत असणारा हा मोटारसायकलवरून शिरवळ बाजूकडे निघून गेला. दरम्यान, हणमंत तालवर याच्यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी वैभव जोतिबा शिवतरे याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची फिर्याद दत्तात्रय विश्वास मतकर यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पोपट कदम हे करीत आहे. (प्रतिनिधी)हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैदशिरवळ येथे तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करणारा वैभव शिवतरे व त्याचा मित्र हा संबंधित दुकानामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्ला करताना कैद झाले आहे. विशेष म्हणजे, हल्ला करण्याअगोदर वैभवने सीसीटीव्ही बंद असल्याची खात्री केली होती. यावेळी दुकानमालकाने त्यावेळेस अनवधनाने सीसीटीव्हीची स्क्रिन बंद केली होती. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असल्याचा समज करून वैभवने हा हल्ला केला. जेणेकरून हा पुरावा दिसणार नाही.धनगरवाडी ग्रामस्थांचे शिरवळ पोलिसांना कठोर कारवाईचे निवेदन दिले. दरम्यान, धनगरवाडी ग्रामस्थांनी संबंधित आरोपीवर व ग्रामस्थांना त्रास देणाऱ्या आरोपींचा भाऊ योगेश शिवतरे व सचिन शिवतरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी निवेदन सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगडे यांना दिले. यावेळी पोलीस दूरक्षेत्रासमोर धनगरवाडी ग्रामस्थांसह महिलांची संख्या मोठी होती.
शिरवळच्या बाजारपेठेत हल्ला
By admin | Published: July 11, 2014 12:24 AM