लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गोरगरीब जनतेला एकवेळचे मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला, त्याचा लाभ जनता घेत आहे. आता सातारा शहरातील शिवभोजन थाळी व्यावसायिकांनी रात्रीच्या वेळी जेवणही देण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्रीच्या वेळी जेवणाची सोय व्हावी, यासाठी शिवभोजन चालकांनी कोणत्याही अनुदानाची अथवा मोबदल्याची अपेक्षा न करता, सेवाभावी वृत्तीने जेवण वाटप करण्याचे ठरवले आहे. यामध्ये मुख्यतः सातारा शहरातील विविध प्रभागातील झोपडपट्टीमधील गरीब व गरजू व्यक्ती, पुलाखाली मुक्काम करणारे तसेच एस. टी. स्टँडवर काम करणारे बेघर लोक, फिरस्ते, कारागीर, मजूर यांचा समावेश असेल.
शिवभोजन केंद्रचालक हे जेवण बनवून स्वतःच्या वाहनातून गरजूंपर्यंत पोहोचून पोलीस बंदोबस्तात त्याचे वाटप करणार आहेत. या वाटपाच्या ठिकाणी गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तसेच सामाजिक अंतर पाळले जावे, यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. रात्रीच्या जेवणासाठी शिवभोजन चालक स्वयंस्फूर्तीने त्यांच्याजवळील अन्न-धान्य वापरणार असून, लाभार्थ्यांची असणारी मोठ्या प्रमाणावरील संख्या विचारात घेता, समाजातील दानशूर व्यक्ती, समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्याकडून धान्य, तेल स्वरूपात मदत प्राप्त करून घेत त्याचा वापर करण्यात येणार आहे.
सातारा शहरासोबतच सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र आहेत. त्याठिकाणीही अशाच पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे. तालुक्याचे तहसीलदार व तालुका पुरवठा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत याचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. सातारा शहरातील या दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांना या उपक्रमासाठी धान्य स्वरूपात तांदूळ, डाळ, खाद्यातील मदत करायची आहे. त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा कार्यालयाशी संपर्क करून आपली बहुमूल्य मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.
आर्थिक मदत स्वीकारणार नाही
आर्थिक स्वरूपातील मदत स्वीकारली जाणार नसून, केवळ धान्य स्वीकारले जाणार आहे. तालुक्याचे तहसीलदार किंवा पुरवठा शाखा येथे या संदर्भात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयातील अव्वल कारकून महेश गंगातीरकर (मोबाईल ९४२३९१०११) आणि पुरवठा निरीक्षक संतोष दळवी (८८८८४८७७६४) हे या संदर्भात समन्वय साधत आहेत.