सातारा : भाजपच्या वतीने पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये सातारा, माण आणि कऱ्हाड दक्षिण या तीन जागांवरील भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. परंतु, कऱ्हाड उत्तरची उमेदवारी कोणाकडे याचे उत्तर अद्याप मिळालेले नसून, उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत रस्सीखेच सुरू असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा खल सुरू आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसची यादी आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे महायुतीतील भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणमधून जयकुमार गोरे तर कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माण आणि सातारासाठी भाजपा तसेच इतर मित्रपक्षांतून फारशी कूरकूर नव्हतीच. कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तरबाबत इच्छुक वाढले होते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कऱ्हाड उत्तरचा सस्पेन्स कायम ठेवत कऱ्हाड दक्षिणचा गड लढवायची जबाबदारी पुन्हा डाॅ.अतुल भोसले यांच्या खांद्यावर टाकली आहे.
याठिकाणाहून शिंदेसेनेचे राजेंद्र यादव हेही इच्छूक होते, परंतू ही जागा आता भाजपसाठी सुटली असल्याने शिंदेसेनेचा बाण भात्यातच राहिला. फलटण आणि कऱ्हाड उत्तरला जागा वाटपाचा पेच असल्यामुळे या जागेचा गुंता सोडवूनच उमेदवार निश्चित होणार आहेत.