प्रगती जाधव-पाटील।सातारा : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. देशात कोणाचीही लाट असली तरी त्याचा कसलाच परिणाम साताऱ्यावर झाला नाही. सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी म्हणजे शिवेंद्रराजे असं गणित झालं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर शिवेंद्रराजे यांनी भाजपात प्रवेश केला. शिवेंद्रराजे यांच्या प्रवेशाने एकीकडे राष्ट्रवादी पक्ष घायाळ झाला तर दुसरीकडे सातारा-जावळी भाजपमय झाली, ही वस्तुस्थिती आहे.
कोणाच्याही भरवशावर न राहता पायाला भिंगरी लावून शिवेंद्रराजे यांनी मतदारसंघ पिंजून काढला. स्वत:पासून दूर झालेल्यांना कोणाही मध्यस्थीशिवाय भेटण्याची अदा कार्यकर्त्यांना भावली आणि पुन्हा त्यांनी सातारा-जावळीवरील आपली पकड घट्ट करत नेली. त्यामुळे राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात गेल्यानंतरही त्यांचा कोणताही गट त्यांच्यापासून दुरावला नाही, हे विशेष. लोकसभा निवडणुकीत सगळे वाद विसरून त्यांनी उदयनराजेंना मतदारसंघातून चांगलं मताधिक्यही मिळवून दिलं. आमदारकीच्या आधी स्वत:ची ताकद आजमविण्यासाठीची ही लिटमस टेस्ट मानली जात आहे. मूळचा स्वतंत्र गट आणि वैयक्तिक संपर्काबरोबर भाजपाची ताकद आता त्यांच्या सोबतीला आहे.
दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश मिळवून उमेदवारी पटकावली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पवार यांना याचा फायदा होईल; पण कमी वेळात राष्ट्रवादीच्या गटाबरोबर संवाद साधणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं याला मर्यादा येऊ लागल्या आहेत. मतदारसंघातील शरद पवार यांना मानणा-या गटाची मते दीपक पवार यांच्याकडे वळतील, यात शंका नाही.सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असला तरी सातारा-जावळी राजघराण्याच्या पाठीशी कायम राहिले आहेत. त्यामुळे बालेकिल्ला राखण्यासाठी शिवेंद्रराजे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच ही लढत समोर येत आहे.युवा ठरणार निर्णायक...पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणारा युवा निर्णायक ठरणार असल्याची जाणीव ठेवून या युवांबरोबर संवाद आणि संपर्क ठेवण्यात शिवेंद्रराजे यशस्वी ठरलेत. तरूणांच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांनी युवांमध्ये स्वत:ची क्रेझ निर्माण केली. या आघाडीवर दीपक पवार पिछाडीवर असल्याचं दिसतं.